Nashik ZP CEO
Nashik ZP CEO Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक ZP सीईओंचा 'सुपर फिफ्टी' प्रोजेक्ट मार्गी; काय आहे प्रकल्प?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या सुपर फिप्टी या प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पथदर्शी प्रकल्पातून निवडलेल्या ५० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शहरातील उपाध्ये क्लासेस या संस्थेला देण्यात आली आहे.

या प्रकल्पातून अनुसूचित जाती, जमातीतील हुशार विद्यार्थ्यांची जेईई, सीईटी व जेईई ॲडव्हान्स या परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ७८ लाख रुपयांच्या निधीची टेंडर प्रक्रिया राबवली. अनेक अडचणींचा सामना करीत ही नावीन्यपूर्ण योजना मार्गी लागली असून पुढील वर्षापासून ही योजना सर्व घटकांसाठी खुली असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी सप्टेंबरच्या अखेरीस पदभार स्वीकारल्यानंतर अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांची जेईई, जेईई ॲडव्हान्स व सीईटी या परीक्षांची तयारी करून घेऊन जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना आयआयटी, एनआयटी येथे प्रवेश मिळावा यासाठी सुपर फिप्टी या योजनेची घोषणा केली होती. सुरवातीला या योजनेविषयी प्रशासनातील अनेकांनी त्रुटी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना या नावीन्यपूर्ण योजनेचे महत्व सांगितल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या योजनेसाठी मान्यता देण्याचे निर्देश दिले.  या योजनेला तत्वता मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेने परीक्षा आयोजित करून दोन हजार विद्यार्थ्यांमधून ५० विद्यार्थ्यांची या योजनेसाठी निवड केली.

दरम्यान जिल्हा नियोजन समितीतीच्या निधीतील नावीन्यपूर्ण योजनेला प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांनी द्यायची असते. मात्र, त्यांची प्रशासकीय मान्यता न घेताच शिक्षण संचालकांकडे प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्यात आला. शिक्षण संचालकांनी तांत्रिक मान्यता दिली, पण प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्याचा सल्ला दिली. त्यानुसार जिल्हा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकीय मान्यता घेत टेंडर प्रक्रिया राबवली. या टेंडर प्रक्रियेत नाशिक शहरातील उपाध्ये क्लासेस, सपकाळ नॉलेज हब व जगदंबा एज्युकेशन सोसायटी यांनी सहभागी घेतला. त्यात दर्जा व सुविधांच्या आधारावर उपाध्ये क्लासेसची निवड करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी निवड झालेल्या ५० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी टेंड प्रक्रियेत सहभागी झालेल्या तीन संस्थांकडून विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण करून घेतले. या योजनेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवासी स्वरुपाचे प्रशिक्षण दिले जाणार असून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण देताना विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवल्या जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, अधीक्षक सुधीर पगार आदी उपस्थित होते.