Chennai Surat Greenfield Expressway Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: सुरत-चेन्नई महामार्ग आता नाशिक-चेन्नई होणार?

वाढवण बंदराच्या उभारणीचे काम सूरू झाल्यामुळे केंद्राच्या भारतमाला योजनेचे औचित्य संपले

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): महाराष्ट्रातील पालघर येथे जगातील मोठ्या दहा बंदरांपैकी एक असलेल्या वाढवण बंदराच्या उभारणीचे काम सूरू झाल्यामुळे केंद्र सरकारच्या देशातील बंदरे एकमेकांना जोडण्याच्या भारतमाला योजनेचे औचित्य संपले आहे. यामुळे सरकारने ही योजनाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका सुरत - चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस-वेला बसला आहे.

या महामार्गाचे काम कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू या राज्यांमध्ये वेगाने सुरू असले, तरी महाराष्ट्रात सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर व नाशिक येथे हा प्रकल्प भूसंपादनाच्या पातळीवरच आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने सोलापूर ते नाशिक या दरम्यान हा २२२ किलोमीटर मार्ग बांधा वापरा हस्तांतरित करा तत्वावर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

या प्रयत्नांना यश आले तर नाशिक ते अक्कलकोटपर्यंत हा मार्ग होऊ शकतो. मात्र, नाशिक ते सुरत हा प्रस्तावित मार्ग गुंडाळल्यात जमा झाल्याने सुरत-चेन्नई बाद होऊन आता नाशिक-चेन्नई असा मार्ग अस्तित्वात येऊ शकतो.

भारतमाला योजनेतून सुरत-चेन्नई या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे महामार्गाची घोषणा केली होती. या योजनेची मुदत २००४ मध्ये संपल्यानंतर केंद्र सरकारने त्या योजनेचे औचित्य संपल्याने झाल्याने पुढील सर्व प्रक्रिया रखडली आहे. कर्नाटक व आंध्र प्रदेशात सुरत-चेन्नई मार्गाचे काम सुरू आहे तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यासह आणखी काही जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेपर्यंतच काम झाले आहे. यामुळे केंद्रrय रस्ते विकास मंत्रालयाने आता या संपूर्ण मार्गाचे टप्पे केले आहेत.

महाराष्ट्रात नाशिक ते अक्कलकोट या २२२ किलोमीटर या मार्गाचा नवीन प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर या मार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रिया सुरू होऊ शकते.

या मार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, नाशिक, निफाड व सिन्नर या तालुक्यांमध्ये भूसंपादान प्रस्तावित करण्यात आले होते. त्यात दिंडोरी, पेठ व सुरगाणा या तालुक्यांमध्ये वनविभागाच्या मोठ्या क्षेत्राचे भूसंपादन करावे लागणार होते. नाशिक तालुक्यातील ३६ जमीनधारक भूसंपादन करू देण्यास तयारही झाले होते. त्यामुळे नाशिक तालुक्यातील ओढा, लाखलगाव व विंचुर गवळी या तीन गावांमधील ४० हेक्टर जागा संपादित होण्याचा मार्गही मोकळा झाला होता. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेच जिल्हा प्रशासनाला भूसंपादनाचे काम थांबवण्याच्या सूचना दिल्या.

आता सुरत - चेन्नई महामार्ग हा विषय मागे पडून या महामार्गाच्या नाशिक-अक्कलकोट या मार्गाबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने नव्याने पुढाकार घेतल्याने या मार्गाबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत.

असा आहे प्रकल्प

  • नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके आणि ७० गावांमधून महामार्ग जाणार आहे.

  • नाशिक जिल्ह्यात १९५ हेक्टर भूसंपादन होणार

  • नाशिक जिल्ह्यात १२२ किलोमीटर महामार्ग

  • महामार्ग सहापदरी असून पाच मीटरचे दुभाजक आहे.

  • नाशिक जिल्ह्यात महामार्ग २६ किलोमीटर भागात जंगलातून जाणार

  • सिन्नर तालुक्यात वावी येथे समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार