Mantralaya
Mantralaya Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : राज्यात निधी खर्चाची का सुरू आहे लगीनघाई? जिल्हा वार्षिक योजनेचा 89 टक्के खर्च

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : लोकसभा निवडणुकांची घोषणा मार्चमध्ये होणार असल्याचे गृहित धरून सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या निधीतील कामे मार्गी लावण्यासाठी लगबग सुरू आहे.

एरवी निधी खर्च करण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्याची वाट बघणारे प्रशासन यावर्षी फेब्रुवारीच्या अखेरपासूनच निधी खर्च करण्यावर भर देत आहे. यामुळे जिल्हा वार्षिक योजनेतून राज्यातील ३६ जिल्हा नियोजन समित्यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षात दिलेल्या १५१५० कोटी रुपयांच्या निधीतून आतापर्यंत ७९ टक्के व वितरित केलेल्या निधीच्या ८९ टक्के निधी खर्च केला आहे. या सर्व जिल्हा नियोजन समित्यांनी त्याना प्राप्त झालेल्या निधीतून जवळपास ८९ टक्के निधी संबधित विभागांना वितरित केला आहे.

निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी अधिकाधिक कामांना प्रशासकीय मान्यता देणे व कार्यारंभ आदेश देण्यावर भर दिला जात असल्याचे सर्वच कार्यान्वयीन यंत्रणांच्या कार्यालयातील सध्याचे चित्र आहे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेसाठी राज्य सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १५ हजार १५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. या तरतूद केलेल्या निधीतून आतापर्यंत सर्व निधी राज्यातील सर्व ३६ जिल्हा नियोजन समित्यांना वितरित केला आहे. या जिल्हा नियोजन समित्यांनी त्यातील जवळपास ८९ टक्के म्हणजे १३ हजार ४५० कोटी रुपये निधी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांनी आयपास प्रणालीवर केलेल्या मागणीच्या अधिन राहून बीडीएस प्रणालीद्वारे वितरित केला आहे.

त्याप्रमाणे कार्यान्वयीन यंत्रणांनी निधी खर्च केलेल्या कामांच्या देयकांची मागणी केल्यानुसार आतापर्यंत ११ हजार ९८० कोटी रुपये निधी खर्च केला आहे. या खर्चाचे प्रमाण वितरित केलेल्या निधीच्या ८९ टक्के दिसत असले, तरी प्रत्यक्षात प्राप्त झालेल्या निधीच्या प्रमाणात ते ७९ टक्के आहे. यामुळे पुढील २४ दिवसांमध्ये २१ टक्के निधी खर्च करावा लागणार आहे.

राज्यात चंद्रपूर आघाडीवर
जिल्हा वार्षिक योजनेतून सर्व जिल्हा नियोजन समित्यांना सर्वसाधारण योजनेतून दिलेल्या निधीच्या विनियोगात राज्यात चंद्रपूर जिल्हा आघाडीवर आहे. चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीला २०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्वसाधारण योजनेतून ३८० कोटी रुपये निधी देण्यात आला. त्या निधीपैकी आतापर्यंत ३२८ कोटी रुपये म्हणजे ८६ टक्के निधी खर्च झाला असून, या जिल्हा नियोजन समितीने जवळपास १०२ टक्के निधी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित केला आहे.

चंद्रपूर पाठोपाठ गडचिरोली (निधी वितरण १०० टक्के), सोलापूर (निधी वितरण ९९ टक्के), अमरावती (निधी वितरण ९८.९४ टक्के), भंडारा ( निधी वितरण ९८.७९ टक्के) या जिल्हा नियोजन समित्यांनी आघाडी घेतली आहे.

नाशिकचा खर्च ८४ टक्के
नाशिक जिल्हा नियोजन समितीला सर्वसाधारण योजनेतून २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६८० कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ६२५ कोटी रुपये म्हणजे ९२ टक्के निधी जिल्हा परिषद व इतर कार्यान्वयीन यंत्रणांना वितरित करण्यात आला असून, आतापर्यंत ५२४ कोटी रुपये म्हणजे ७७ टक्के निधी खर्च करण्यात आला आहे.

नाशिक विभागात धुळे जिल्हा नियोजन समितीने आघाडी घेतली असून आतापर्यंत २६५ कोटी प्राप्त निधीतून २४९ कोटी रुपये निधी वितरित केला असून, २१२ कोटी रुपये खर्च केला आहे. त्यानंतर विभागात नंदूरबार, जळगाव व नगर या जिल्हा नियोजन समित्यांनी अनुक्रमे ८९ टक्के, ७५ टक्के व ७४ टक्के निधी वितरित केला आहे.