नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि सुलभ करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने मोठे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सहकार्याने आतापर्यंतचा सर्वात मोठा सार्वजनिक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत तब्बल ४,५०० विशेष बसेसची एकात्मिक व्यवस्था केली जाणार असून, याद्वारे दररोज ३३ लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक करण्याची अवाढव्य क्षमता निर्माण केली जाईल.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुरक्षित, नियोजनबद्ध आणि सुलभ व्हावा, यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून व्यापक सार्वजनिक वाहतूक आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत एकूण ४५०० बसची व्यवस्था करण्यात येणार असून, दररोज ३३ लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक करण्याची क्षमता निर्माण केली जाणार आहे.
या नियोजनानुसार रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळ ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत ३००० बसची विशेष सेवा उपलब्ध असेल. तसेच रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे स्थानकांपासून पुढील प्रवासासाठी स्वतंत्र १५०० बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. या एकात्मिक वाहतूक व्यवस्थेमुळे मुख्य धार्मिक परिसरात खासगी वाहनांचा ताण कमी होऊन भाविकांना सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात स्नानाला मोठे महत्व असते. सिंहस्थाच्या काळात वेगवेगळ्या पर्वण्यांना भाविकांची गर्दी होत असली, तरी शाही (अमृतस्नान) स्नानाच्या तीन विशेष पर्वण्यांना प्रचंड गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेऊन कुंभमेळा प्राधिकरणाने वाहतूक आराखडा तयार केला आहे. या वाहतूक आराखड्यात बाह्य वाहनतळ, अंतर्गत प्रवासी उतरवण्याची ठिकाणे आणि रामकुंड तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पायी मार्ग व्यवस्था अशा तीन स्तरांवर नियोजन करण्यात आले आहे.
अमृत स्नानासारख्या गर्दीच्या दिवसांमध्ये वाहतूक कोंडी टाळणे आणि भाविकांचा शेवटच्या टप्प्यातील प्रवास सुरळीत करणे, हा या व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे. या आराखड्यानुसार रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी ४६ बाह्य वाहनतळांपासून विशेष बस सेवा चालवण्यात येईल. यामध्ये नाशिकमधील बाह्य वाहनतळ ते अंतर्गत ठिकाणांसाठी ९०० बस, नाशिकमधील वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर मार्गासाठी १४८५ बसेस, तर त्र्यंबकेश्वरमधील अंतर्गत वाहतुकीसाठी ३२५ बसेस उपलब्ध केल्या जाणार आहेत.
त्याचप्रमाणे गर्दीच्या काळातील अतिरिक्त गरज लक्षात घेऊन २९० बसेस राखीव ठेवण्यात येणार आहेत. या व्यवस्थेद्वारे २४ तासांत सुमारे ४०७ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, दररोज सुमारे २५.३६ लाख भाविकांची वाहतूक करण्याची क्षमता उपलब्ध होणार आहे.
रेल्वेप्रवाशांसाठी स्वतंत्र नियोजन
रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच रेल्वे स्थानकांना बस सेवेशी जोडण्यात येणार आहे. यासाठी १५०० बसेसचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी ५२० बसेस रेल्वे स्थानक ते अंतर्गत वाहनतळ आणि ६८० बसेस रेल्वे स्थानक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर धावतील. तसेच ३०० बसेस राखीव ठेवण्यात येतील. या व्यवस्थेतून दररोज सुमारे ८.२६ लाख रेल्वे प्रवाशांची वाहतूक करता येणार आहे.
अमृत स्नानाच्या प्रमुख दिवसांमध्ये भाविकांची सर्वाधिक गर्दी अपेक्षित असल्याने खासगी वाहनांना निश्चित केलेल्या बाह्य वाहनतळांपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. तेथून पुढे भाविकांना राज्य परिवहन महामंडळाच्या विशेष बसद्वारे धार्मिक परिसरापर्यंत पोहोचविण्यात येईल. रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात प्रामुख्याने पायी वाहतुकीवर भर दिला जाणार आहे.
संपूर्ण बस वाहतुकीवर उपग्रह आधारित यंत्रणेद्वारे देखरेख ठेवण्यात येणार असून ही व्यवस्था एकात्मिक नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येईल. त्यामुळे बसची उपलब्धता, फेऱ्यांचे नियोजन, प्रतीक्षा वेळ आणि गर्दीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी सांगितले की, अमृत स्नानाच्या दिवशी सर्वाधिक वर्दळ अपेक्षित असलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विशेष रेल्वे नियोजनाशी समन्वय साधून वाहतूक व्यवस्था राबविण्यात येणार आहे.
कुंभमेळ्यासाठी अनेक भाविक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येतात. त्यांच्या प्रवासातील शेवटचे काही किलोमीटर सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध व्हावेत, यावर आमचा भर आहे. मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन आणि भाविकांची सुविधा लक्षात घेऊन ही विशेष बस व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
- शेखर सिंह, आयुक्त, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : सार्वजनिक वाहतूक नियोजन
४५०० बसची एकात्मिक व्यवस्था
३००० बस : रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी
१५०० बस : रेल्वे प्रवाशांच्या वाहतुकीसाठी
दररोज ३३ लाखांहून अधिक प्रवासी क्षमता
४६ बाह्य वाहनतळ जोडले जाणार
५ रेल्वे स्थानकांवरून बस सेवा
रस्ते मार्गावरील व्यवस्था
९०० बस : नाशिक बाह्य वाहनतळ ते अंतर्गत भाग
१४८५ बस : नाशिक वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर
३२५ बस : त्र्यंबकेश्वर अंतर्गत वाहतूक
२९० बस राखीव
क्षमता : दररोज २५.३६ लाख प्रवासी
रेल्वे प्रवाशांसाठी व्यवस्था
५२० बस : रेल्वे स्थानक ते अंतर्गत वाहनतळ
६८० बस : रेल्वे स्थानक ते त्र्यंबकेश्वर
३०० बस राखीव
क्षमता : दररोज ८.२६ लाख प्रवासी