NMC, Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: महापालिकेचा अजब कारभार! रिक्त जागा 3 हजार मग भरती केवळ 300 जागांसाठीच का?

सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये रस्ते, पूल, बांधकाम, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, नदी स्वच्छता आदी विभागांत मोठ्याप्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासणार

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): नाशिक महापालिकेत विविध पदांच्या तीन हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त असताना सरळसेवा भरतीतून केवळ ३०० जागा भरल्या जाणार आहेत.

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यामुळे नाशिक महापालिकेला वाढीव मनुष्यबळाची गरज लागणार असल्याने सरकारने महापालिकांमध्ये मनुष्यबळ भरती करण्याच्या निकषामध्ये काही सवलत दिली आहे. नाशिक महापालिकेला स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी विभागात सहायक व कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागात चालक आणि फायरमन मिळून ३०० रिक्त जागा सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्याची परवानगी दिली आहे.

यामुळे महापालिकेने सहायक व कनिष्ठ अभियंता पदासाठी ११४ जागा व चालक, फायरमन यांच्या १८६ जागा, अशा ३०० जागांच्या भरतीची जाहिरात दिली आहे. नाशिक महापालिकेत तीन हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त असताना या सरळसेवा भरतीतून अवघ्या ३०० जागा भरल्या जाणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये रस्ते, पूल, बांधकाम, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, नदी स्वच्छता आदी विभागांची कामे मोठ्याप्रमाणावर होणार आहे. यामुळे महापालिकेला तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.

तसेच कुंभमेळा काळात आपत्ती व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा असल्याने सरकारने महापालिकेला स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी विभागात सहायक व कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागात चालक आणि फायरमन यांची सरळसेवा पद्धतीने भरती करण्यास परवानगी दिली आहे. महानगरपालिका आस्थापनेवर ७०८२ जागा मंजूर आहेत.

यातील तीन हजारहून अधिक जागा रिक्त आहेत. मात्र, या जागा भरल्यास महापालिकेचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक होईल, यामुळे नगरविकास विभागाकडून नाशिक महापालिकेला कर्मचारी भरती करण्यास परवानगी दिली जात नव्हती.

महापालिकेकडून २०२२ पासून भरती प्रक्रियेची तयारी सुरू होती. सुरुवातीला आरोग्य व अग्निशमन विभागाचे मिळून ७०६ पदांची भरती करण्याचा निर्णय २०२२मध्ये महापालिकेने घेतला होता. त्यासाठी परीक्षा घेणाऱ्या संस्थेची निवड प्रक्रियाही पूर्ण केली होती. मात्र, सरकारकडून भरती राबवण्यास परवानगी न मिळाल्याने आरोग्य विभागातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हे राष्ट्रीय आरोग्य अभियानमधून कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले.

त्यानंतर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची तांत्रिक मनुष्यबळाची निकड लक्षात घेऊन शासनाने गेल्या फेब्रुवारीत सरळसेवेने विविध विभागातील १४० अभियंत्यांची पदे भरण्यास मान्यता दिली होती. तसेच या भरतीसाठी आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मर्यादेची अट शिथील करण्यात आली.

त्यानुसार महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियंता गट 'क'मधील ११४ पदांसाठी तसेच गट 'क' आणि 'ड' मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील १८६ रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी १० नोव्हेंबर ते एक डिसेंबर २०२५ या कालावधीत अर्ज करण्याची मुदत आहे.

महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवेतील सहायक अभियंता (विद्युत) तीन, सहायक अभियंता (स्थापत्य) १५, सहायक अभियंता (यांत्रिकी) चार, कनिष्ठ अभियंता (विद्युत) सात, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४६, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) नऊ, कनिष्ठ अभियंता (वाहतूक) तीन, सहायक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) २४ आणि सहायक कनिष्ठ अभियंता (विद्युत) तीन पदे भरण्यात येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील अग्निशामक अर्थात फायरमनची १५० आणि चालक-यंत्रचालक, वाहनचालक (अग्निशमन) ३६ अशी पदे भरण्यात येणार आहेत.