नाशिक (Nashik): नाशिक शहरातील सर्वात वर्दळीचे व वाहतूक कोंडीचे ठिकाण असलेल्या द्वारका चौक येथे भूयारी मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर आता द्वारका चौक ते नाशिकरोड या मार्गाचे आठपदरी कामास मंजुरी मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या मार्गाच्या प्रस्तावात काही बदल सुचवल्या नंतर नाशिक महापालिका त्या दुरुस्त्या करून नव्याने प्रस्ताव सादर करणार आहे. त्यानंतर या रस्त्याला मंजुरी मिळू शकणार आहे. या रस्ताकामाला या महिन्यात मंजुरी मिळाल्यास सिंहस्थापूर्वी त्याचे काम पूर्ण होऊ शकते.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने नाशिक शहरातील दिंडोरीरोड, त्र्यंबकरोड, पेठरोड या प्रमुख रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे. या रस्त्यांप्रमाणेच महत्वाचा असलेला नाशिकरोड मार्गाच्या कामास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. नाशिक शहतात प्रस्तावित करण्यात आलेल्या निओमेट्रोसाठी द्वारका चौक ते दत्तमंदिर चौक या दरम्यान उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता.
दरम्यान निओमेट्रो प्रकल्प जवळपास रद्द झालेला आहे. यामुळे आता द्वारकाचौक ते नाशिकरोड या मार्गाचे काम करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग केलेला आहे. यामुळे नाशिक महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव सादर केला.
त्यांनी तो प्रस्ताव दिल्लीच्या कार्यालयात पाठवल्यानंतर सोमवारी (ता.९) दिल्लीत बैठक झाली. बैठकीत महापालिकेचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागूल, नवनीत भामरे यांनी प्रकल्प अहवाल सादर केला. त्यात केंद्रिय रस्ते व वाहतूक मंत्रालयाचे प्रमुख गुप्ता आणि रोहित राजपूत यांनी काही तांत्रिक सुधारणा सुचवल्या आहेत.
महापालिका आता या तांत्रिक सुधारणा करून फेरप्रस्ताव सादर करणार आहे. त्यानंतर महिनाभरात या कामाचा अंतिम आराखडा प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडून निधी उपलब्ध होणार असून, अंमलबजावणी महापालिका करणार आहे.
असा आहे रस्ता...
त्या मुख्य वाहतुकीसाठी ६ पदरी रस्ता आणि दोन्ही बाजूंनी सर्व्हिसरोड असे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आगामीसिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या पक्क्या बांधकामांना महापालिकेने आधीच नोटिसा बजावल्या आहेत. आता प्रकल्पाची गती कायम राखण्यासाठी लवकरच या मुख्य रस्त्याचलगतचे अतिक्रमण काढले जाणार आहेत.