NMC, Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: महापालिका निवडणुकीपूर्वी रस्ते दुरुस्तीचा दुसरा राऊंड; 125 कोटी खर्चून...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेने (NMC) भर पावसात रस्ते दुरुस्ती केल्यानंतर ती सर्व दुरुस्ती पाण्यात वाहून गेली आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे जसेच्या तसे आहेत.

महापालिका निवडणुकीत रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय यायला नको, यामुळे महापालिकेने निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पुन्हा नाशिक शहरातील रस्ते दुरुस्तीची मोठी मोहिम हाती घेतली आहे. शहरातील विविध भागांमधील रस्ते दुरुस्तीसह खडीकरण, डांबरीकरण व काँक्रिटीकरणासाठी १२५ कोटींच्या ३७ कामांना महासभेने मंजुरी दिली आहे.

दरवर्षी महापालिका पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामे करते. तसेच पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे तात्पुरते बुजवण्याची कामे करीत असते. यावर्षी एप्रिल अखेरपासूनच सलगपणे पावसाला सुरवात झाली. यामुळे पावसाळापूर्व कामांना वेळ मिळाला नव्हता. यामुळे पावसाने रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली.

खड्ड्यांमधून वाहने चालवणे अवघड झाले. तसेच अपघातही झाले. यामुळे महापालिकेविरोधात वातावरण तयार झाले. याचा फटका निवडणुकीत बसू नये म्हणून भाजप नेत्यांच्या विशेषतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेवरून महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रस्ते दुरुस्तीची मोहीम राबवली. त्यांनी प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमला. ही दुरुस्ती सप्टेंबरमध्ये झाली. मात्र, पाऊस ऑक्टोबर अखेरपर्यंत न थांबल्याने दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था जशीच्या तशी झाली आहे. 

पाऊस उघडल्यानंतर बांधकाम विभागाने अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे तसेच दुरुस्ती हाती घेण्याच्या दृष्टीने तब्बल १२५ कोटी रुपयांचे ३७ प्रस्ताव महासभेकडे सादर केले होते. या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. यातील बहुतांश कामे ही गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम करण्यात आलेल्या रस्ते दुरुस्तीची आहेत.

महापालिका हद्दीत केबल कनेक्शन, गॅस पाईप लाईन यासारखी कामे करणाऱ्या संस्था तसेच कंपन्यांकडून रस्ते नादुरुस्ती केल्याच्या बदल्यात शुल्क घेत असते. त्यानुसार एमएनजीएल कंपनीने रस्ते खोदून केलेल्या नुकसानीपोटी रक्कम घेतली होती. या रकमेतील शिल्लक व टेंडर प्रक्रियेत कमी दराने टेंडर दिल्यामुळे झालेल्या बचत रकमेतूनही अनेक रस्त्यांची प्रस्तावित केली आहेत.

या प्रभागांत होणार कामे

  • पंचवटी विभाग : प्रभाग क्र. १, २, ३, ४, ५ व ६

  • पश्चिम विभाग : प्रभाग क्र. ७, १२ व १३

  • पूर्व विभाग : प्रभाग क्र. १५, १६, २३, ३०

  • नाशिकरोड विभाग : प्रभाग क्र. १९, २०, २१, २२

  • नवीन नाशिक विभाग : प्रभाग क्र.२४, २५, २८, ३१

  • सातपूर विभाग : प्रभाग क्र. ८, ९, १०, ११,२६