Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: प्रशासक काळात महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम; ठेवी अडीच हजार कोटींवर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): महापालिकेतील २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळातील आर्थिक श्वेतपत्रिका अखेर आयुक्त मनीषा खत्री यांनी सादर केली. या श्वेतपत्रिकेनुसार नाशिक महापालिकेच्या विविध बँकांमध्ये सध्या तब्बल २,५६१ कोटी ८७ लाख २९ हजार ७१८ रुपयांच्या ठेवी असल्याचे समोर आले आहे.

महापालिकेतील प्रशासकीय राजवटीच्या कार्यकाळात अनेक चुकीच्या गोष्टी घडल्याचा संशय व्यक्त करीत त्या काळातील घेतलेले निर्णय व निधी खर्च, उत्पन्न याबाबतचा हिशेब मागण्यासाठी त्या काळातील श्वेतपत्रिका सादर करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सादर केलेल्या श्वेतपत्रिकेत महापालिकेच्या ठेवी या काळात दुपटीपेक्षा अधिक वाढल्याचे समो आले आहे. दरम्यान, प्रशासनाने सादर केलेल्या श्वेत्रपत्रिकेवर अभ्यास करून त्यावर विशेष महासभा घेतली जाणार आहे, असे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी स्पष्ट केले आहे.
 

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सादर केलेल्या श्वेतपत्रिकेत प्रशासक काळात महापालिकेने केलेली भांडवली खर्च, महसुली खर्च याची माहिती देण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या ठेवीं, उत्पन्न, कर्मचारी वेतन, निवृत्तीवेतन आदींबाबत सविस्तर माहिती दिली आहे. महापालिकेला चार वर्षांत विविध स्रोतांतून ११,५८३.९० कोटी रुपये प्राप्त झाले असून, भांडवली कामे, देखभाल-दुरुस्ती, वेतन-पेन्शन, कार्यालयीन व अग्रिम खर्चावर ११,४४२.४२ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

श्वेतपत्रिकेतील आकडेवारीनुसार, २०२१-२२ मध्ये महापालिकेचे उत्पन्न १,८८९.३७ कोटी रुपये होते. ते २०२२-२३ मध्ये २,०५४.६० कोटी, २०२३-२४ मध्ये २,०६६.४६ कोटी, २०२४-२५ मध्ये २,३०२.४३ कोटी आणि २०२५-२६ मध्ये ३,२७१.०४ कोटी रुपये झाले. त्याच कालावधीत खर्च अनुक्रमे २,१३४.४७ कोटी, २,०५०.८० कोटी, २,०३५.५३ कोटी, २,२७२.९४ कोटी आणि २,९४८.६८ कोटी रुपये इतका नोंदविण्यात आला. खर्चाच्या वर्गवारीत भांडवली विकासकामांवर सर्वाधिक ४,०१४ कोटी रुपये खर्च झाले.

त्याखालोखाल देखभाल व दुरुस्तीवर ३,०३३.६० कोटी, कर्मचारी वेतन व पेन्शनवर ३,२२३.८५ कोटी, कार्यालयीन खर्चावर ७००.७६ कोटी आणि अग्रिम खर्चावर ४७०.०८ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे श्वेतपत्रिकेत नमूद आहे. महापालिकेच्या बँक ठेवींमध्येही या कालावधीत मोठी वाढ झाली. २०२१-२२ मध्ये १,१४४.७० कोटी रुपये असलेल्या ठेवी  २०२५-२६ अखेर २,५६१.८७ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. शहरातील विविध बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनपाच्या ठेवी असल्याने महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे प्रशासनाने श्वेतपत्रिकेतून अधोरेखित केले आहे.

सहा वर्षांतील ठेवी अशा

२०२१-२२ : १,१४४ कोटी

२०२२-२३ : १,२५७ कोटी

२०२३-२४ : १,३९३ कोटी

२०२४-२५ : १,५२१ कोटी

२०२५-२६ : २५६१ कोटी