Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागासाठी वाईट बातमी; 'त्या' 38 विहिरी...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जलजीवन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जिल्ह्यात १२२२ पाणी पुरवठा योजना मंजूर आहेत. या योजनांपैकी ६०४ योजनांमधील विहिरींच्या उद्भवाची मे व जूनमध्ये भूजल शास्त्रज्ञांकडून तपासणी करण्यात आली. त्यात आदिवासी भागातील ३८ विहिरी उद्भव चाचणीमध्ये नापास झाल्या असून इतर भागातील १२ विहिरींना पुरेसे पाणी आढळले नाही. यामुळे या सर्व ठिकाणी नवीन विहिरी खोदण्यात येणार आहेत. उद्भव चाचणीत सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमधील प्रत्येकी ११ व १० विहिरी नापास झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्याच्या आदिवासी भागातील कठीण खडकामुळे तेथे विहिरींवर आधारित पाणी योजना अपयशी ठरण्याची भीती खरी ठरल्याचे समोर आले आहे.
 

जलजीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १४१० कोटींच्या १२२२ योजनांना मंजुरी दिली असून त्यातील ६०४ योजनांच्या विहिरींची कामे एप्रिलपर्यंत पूर्ण झाली. या ६०४ विहिरींच्या उद्भवाची चाचणी मे व जूनमध्ये करण्यात आली. यात ५० विहिरींना गरजेपेक्षा कमी उद्भव असल्याचे आढळून आले. यामुळे या सर्व ५० ठिकाणी नवीन उद्भव विहिरींना मंजुरी दिली आहे. पाणी पुरवठा योजनेत एका विहिरीला तेथील भौगोलिक परस्थितीनुसार साधारणपणे साडेतीन ते सात लाख रुपये खर्च येतो. उद्भव तपासणीत ती विहिर उत्तीर्ण झाल्यानंतर विहिरीच्या कठड्यांचे बांधकाम केले जाते. यामुळे एका योजनेवरील विहिरीस साधारणपणे दहा लाख रुपये खर्च येत असतो.

उद्भव चाचणीत नापास झालेल्या विहिरींपैकी सर्वाधिक विहिरी या प्रामुख्याने सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांमधील आहेत. सुरगाण्यात ११ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात १० विहिरी उद्भव चाचणीत नापास झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार केल्यास पश्चिम भागात सर्वाधिक पाऊस होत असला, तरी तेथील कठीण खडकामुळे भूगर्भात भूजलसाठा होत नाही. यामुळे या भागात प्रत्येक उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो.

यामुळे या आदिवासी भागात पाणी योजनांचा आराखडा तयार करताना विहिरींवर आधारित योजना करण्यापेक्षा धरणांमधून जलवाहिन्या उभारण्याच्या योजना उभारण्याबाबत तत्कालीन लोकप्रतिनिधींनी सांगितले होते. मात्र, मोठ्या योजना केल्यास त्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून कराव्या लागतील व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या योजनांची संख्या कमी होईल. यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांनी संगनमताने विहिरींच्या उद्भवावर आधारित योजनांवर भर दिला. परिणीमी पहिल्या टप्प्यातील ६०४  विहिरींच्या उद्भव चाचणीमध्ये आदिवासी भागातील ३८ विहिरी नापास झाल्या आहेत.

नव्या विहिरींचे काय?
पहिल्या टप्प्यातील ६०४ विहिरींच्या उद्भवाची चाचणी झाल्यानंतर त्यातील ५० विहिरी नापास झाल्याने तेथे नवीन विहिरी खोदण्यात येणार आहेत. मुळात जिल्ह्याच्या पश्चिम भागात कठीण खडकामुळे भूगर्भात पाण्याचे झरे नाहीत, ही वैज्ञानिक बाब आहे. यामुळे नवीन ठिकाणी विहिरी खोदल्या तरी तेथे पाणी मिळेलच याची काहीही खात्री देता येणार नाही. यामुळे या भागात शाश्वत पाण्याच्या स्त्रोतांचा पर्याय शोधण्याची गरज आहे. तेथे नवीन विहिरी खोदून काहीही फायदा होणार नाही, असे बोलले जात आहे.

सिन्नर, येवल्यात सर्व विहिरींना पुरेसे पाणी?
नाशिक जिल्ह्यात सिन्नर व येवला हे कायमस्वरुपी दुष्काळी तालुके आहेत. या तालुक्यांमधील विहिरींच्या उद्भवाची चाचणी घेतली असता तेथे सर्व विहिरींना पुरेसे पाणी असल्याचे आढळून आल्यासे भूजल शास्त्रज्ञांनी दिलेल्या अहवालात नमूद आहे. या तालुक्यांमध्ये पाणी योजना असलेल्या गावांमध्येही उन्हाळ्यात पाणी पुरवठ्यासाठी टँकरची संख्या अधिक असते. यामुळे या उद्भव चाचणीबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

दरम्यान उद्भव चाचणीत नापास झालेल्या विहिरींची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे : कळवण (५), मालेगाव (५), सटाणा (२), नांदगाव (२), त्र्यंबकेश्वर (१०), दिंडोरी (६), निफाड (१), पेठ (३), सुरगाणा (११), इगतपुरी (१), देवळा (१), चांदवड (१).