water
water Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये २०५१ पर्यंतचा विचार करून पाणी पुरवठ्याचा मास्टरप्लॅन

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील 2051 मधील लोकसंख्येला पाणी पुरवठ्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागार समिती नेमण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने स्थगित केला आहे. हा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा सल्ला घेतला जाणार आहे.

शहरातील २०५१ पर्यंतच्या संभाव्य ५५ लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनासाठी महापालिकेतर्फे मास्टर प्लॅन तयार केला जात आहे. मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनी नियुक्तीच्या प्रस्तावाला आयुक्तांनी स्थायी समिती सभेत  स्थगिती दिली. ही नियुक्ती अमृत योजना दोनच्या मार्गदर्शक सूचनेशी विसंगत असल्याने स्थगिती दिली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभा झाली. यावेळी आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी 2051मधील नाशिक शहरातील लोकसंख्या 55 लाख असणार हे गृहीत धरून पाणी पुरवठा योजनांसाठी मास्टर प्लॅन तयार केला जाणार आहे.यात गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

याशिवाय  गंगापूर, मुकणे धरणावरील अस्तित्वातील पंपिंग स्टेशन, जलशुद्धीकरण केंद्रांचे आधुनिकीकरण आणि क्षमतावाढ, नव्याने विकसित होणाऱ्या भागात जलवाहिन्यांचे जाळे टाकणे, जलकुंभ निर्मिती, गळती रोखण्यासाठी उपाययोजनांचा समावेश या मास्टर प्लॅनमध्ये असणार आहे. मास्टर प्लॅन तयार करून शासनाच्या विविध योजनांमधून निधी मिळविण्यासाठी सविस्तर अहवाल तयार करण्याकरिता सल्लागार संस्थेची नियुक्ती करणे आवश्यक असल्याने पालिकेने मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागार कंपनी नेमण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांपूर्वी टेंडर प्रक्रिया राबवली. त्यात मुंबईची एन जे एस इंजिनीयरिंग इंडिया प्रा. लि. या सल्लागार संस्थेचे टेंडर अंतिम केले होते. त्यासाठी 1.96 कोटी रुपये तरतुदीस मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती पटलावर सादर केला होता. मात्र, नुकतेच 17 सप्टेंबरला केंद्र सरकारच्या अमृत 2 या योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित झाल्या आहेत. महापालिकेने सल्लागार संस्था नियुक्त करण्यासाठी राबवलेली टेंडर प्रक्रिया या सूचनांशी विपरित असल्याने आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी या टेंडरला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.

जीवन प्राधिकरणला काम देण्याची तरतूद

अमृत योजना दोन बाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार कोणत्याही पाणी पुरवठा योजनांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेतील तज्ज्ञ समितीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेचे सल्लागार मंडळ असून त्यांची नियुक्ती कशी करावी, याबाबतही स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यामुळे नाशिक महापालिका आता या सल्लागार मंडळाच्या नियुक्तीसाठी प्रयन्त करणार आहे.