Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : उद्यान देखभालीच्या आडून राजकीय कार्यकर्त्यांसाठी टेंडर?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील ५२४ उद्यानांपैकी पहिल्या टप्प्यात सहा विभागांतील २७३ उद्यांनाची तीन वर्षांसाठी खासगीकरणाद्वारे देखभालीसाठी २५ कोटी रुपयांचे टेंडर महापालिकेने अखेर प्रसिद्ध केले.

महापालिकेने तीन वर्षांपूर्वी राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता ठेकेदारांना दिलेल्या उद्यानांची स्वच्छता कागदावरच असताना पुन्हा त्याच ठेकेदारांच्या सोयीसाठी टेंडर प्रसिद्ध केल्याची चर्चा आहे. महापालिकेने यापूर्वी साडेतीनशे उद्यानांची आउटसोर्सिगने केलेली स्वच्छता वादात सापडून संबंधितांवर उद्यान विभागाने कारवाईही केली होती.

महापालिकेने शहरातील लहानमुलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी जवळपास ४२९ मोठी व इतर अशी ५२४ उद्याने उभारली आहेत. मात्र, त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे उद्यानांची देखभाल-दुरुस्ती आउटसोर्सिंग पद्धतीने केली जाते. महापालिकेने तीन वर्षांपूर्वी ५२४ पैकी ३४१ उद्याने ठेकेदारांकडे देखभाल-दुरुस्तीसाठी सोपवली होती. मात्र, या तीन वर्षांमध्ये बहुतांश ठेकेदारांनी उद्यानांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले. यामुळे उद्यानांसह तेथील खेळणी, झाडांची दुरवस्था झाली आहे. बऱ्याच ठेकेदारांकडे मनुष्यबळ नसताना ते केवळ कागदोपत्री देखभाल दाखवून बिले काढत असल्याचे समोर आले. एकेका ठेकेदाराकडे तीन ते चार उद्याने देखभालीसाठी सोपवली होती.

यामुळे या ठेकेदारांकडून दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेकडून बिलांची वसुली सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंढे यांनी उद्यान विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देखभाल-दुरुस्तीसाठी दिलेल्या ३४१ उद्यानांची नेमकी स्थिती काय याचा अहवाल उद्याननिरीक्षकांकडून मागविला होता. तसेच त्यांनी स्वतः या उद्यानांची पाहणी केल्यानंतर ठेकेदारांकडून उद्यानांचीकेवळ कागदोपत्री देखभाल सुरू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ३५ उद्यानांच्या ठेकेदारांना नोटिसा बजावण्यात आल्या. काही उद्यानांमध्येही गैरप्रकार आढळल्याने उद्यान विभागातील १७ कर्मचाऱ्यांनादेखील  नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यामुळे उद्यानांची देखभाल दुरुस्ती आउटसोर्सिंग पद्धतीने दिली जाईल, असे वाटत असतानाच महापालिकेने यावेळीही पुन्हा ५२४ पैकी २७३ उद्यानांची तीन वर्षांसाठी देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी  निविदा प्रसिद्ध केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कार्यकर्त्यांसाठी उधळपट्टी?
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या टेंडरनुसार उद्यान विभागाने देखभालीसाठी उद्यानांचे तीन स्वतंत्र विभाग केले असून, त्यात महत्त्वाची, कमी महत्त्वाची उद्याने आणि महापालिकेनेच देखभाल करावयाची उद्याने यांचा समावेश आहे. या उद्यानांच्या देखभालीसाठी आउटसोसिंगवर तब्बल २५ कोटींची उधळपट्टी केली जाणार आहे. या उद्यानांचे देखभाल-दुरुस्तीचे काम दिले जाणारे ठेकेदार हे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत. यामुळे या कार्यकर्त्यांच्या सोईसाठी आउटसोर्सिंगने काम केले जात असल्याचे बोलले जात आहे.