road
road Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक शहरातील दोन हजार किमीचे रस्ते होणार काँक्रिटचे

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेच्या डांबरी रस्त्यांवर या पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडल्याने महापालिका टीकेची धनी झाली. मागील दोन वर्षात साडेसहाशे कोटी रुपये खर्च करूनही यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांची गुणवत्ता घसरली. यामुळे बांधकाम विभागाकडून आता यापुढे नवीन रस्ते तयार करताना सिमेंट काँक्रिटचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिंहस्थ निधीच्या माध्यमातून होणारे रस्ते काँक्रिटचे केले जाणार आहेत.

नाशिक शहरात अडीच हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यातील 95 टक्के रस्ते डांबरीकरणाच्या माध्यमातून, तर 5 टक्के रस्ते काँक्रिटीकरणच्या माध्यमातून विकसित करण्यात आले. या रस्त्यांवर 650 कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची चाळणी झाली आहे. यामुळे महापालिकेवर सर्व थरातून टीका झाली. सध्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रगतीपथावर असले तरी यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महापालिकेची मोठ्या प्रमाणात मानहानी झाली. अनेक आंदोलने झाली, रस्ता तयार झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांना डिफेक्ट लायबिलिटी पिरियड अर्थात देखभाल दुरुस्तीसाठी तीन वर्ष मुदत असते. त्या माध्यमातून रस्त्यांची दुरुस्ती होत असली तरी महापालिकेच्या बांधकाम विभागाने यातून तोडगा काढण्यासाठी शहरातील सर्वच रस्ते काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला आहे.

पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर पाणी साचल्यास त्यावर खड्डे पडतात. शहरातील रस्ते समपातळीत करणे शक्य नसल्याने रस्त्यावर पाणी साचतेच यामुळे दरवर्षी या रस्त्यांवर खड्डे पडण्याची समस्या उद्भवतेच. याउलट काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून केलेल्या रस्त्यांना ऊन, वारा, पाऊस याचा काहीही परिणाम होत नाही व एकदा केलेले रस्ते अनेक वर्षे टिकतात. विशेष म्हणजे काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडत नाही. डांबरीकरणाचे रस्ते करून दर पावसाळ्यात ठेकेदारांच्या मागे लागण्यापेक्षा त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार आहे. दरम्यान सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेले रिंगरोड सुद्धा काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारच प्रस्ताव तयार केला जाणार आहे.