Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: नाशकातील रस्त्यांबाबत पालिका आयुक्तांचा मोठा निर्णय; लवकरच

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिका (NMC) हद्दीतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी  महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर (Dr. Ashok Karanjkar) यांनी सर्व रस्ते टप्प्याटप्प्याने काँक्रिटचे करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी बांधकाम विभागाला धोरण तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महापालिकेने यापूर्वीच शहरातील प्रमुख रस्ते सिंहस्थापूर्वी काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला असताना नवीन आयुक्त करंजकर यांनी डांबरी रस्त्यांचा दरवर्षीचा देखभालीचा खर्च टाळण्यासाठी सर्वच रस्ते काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक महापालिका हद्दीत जवळपास २२०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी गेल्या तीन वर्षांत जवळपास साडेसहाशे कोटींचा खर्च झाला आहे. मात्र, तरीही प्रत्येक पावसाळ्यात शहरातील रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांवरून महापालिकेवर टीका होते व महापालिकाही नेहमीप्रमाणे खड्डे बजवत असते.

यामुळे दरवर्षी रस्ते दुरुस्ती, पावसाळ्यात खड्डे, महापालिकेकडून खड्डे बुजवणे व पुन्हा पुढच्या वर्षी रस्ते दुरुस्ती हा अनेक वर्षांचा शिरस्ता पडला आहे. खरे तर एखादा रस्ता डांबरीकरणासाठी मंजूर झाल्यानंतर तीन ते पाच वर्षे या रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे असते. परंतु, शहरातील अशा रस्त्यांची लांबी केवळ दोनशे ते अडीचशे किलोमीटर आहे. उर्वरित रस्त्यांचे दायित्व पालिकेकडेच असल्याने या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेला दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात.

दर वर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे नाशिककरांना त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी सलग तीन महिने झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने महापालिकेविराधात उच्च न्यायालायत याचिका दाखल झाली होती. त्या याचिकेवर अद्याप काही निकाल आलेला नसताना यावर्षी पुन्हा नवीन खड्डे पडले आहेत.

त्यामुळे नूतन आयुक्त डॉ. करंजकर यांनी पदभार घेतल्यानंतर शहरातील खड्ड्यांबाबत बांधकाम विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी डांबरी रस्ते उखडण्याचे प्रकार लक्षात घेत भविष्यात फक्त काँक्रिटचेच रस्ते करण्यास प्राधान्य देण्याबाबतचे धोरण तयार करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

आयुक्तांच्या या निर्णयामुळे आता शहरातील रस्त्यांवरील डांबरीकरण आणि अस्तरीकरणावर होणाऱ्या कोट्यवधींच्या उधळपट्टीस 'ब्रेक' लागणार आहे. महापालिकेच्या बजेटमधून उपलब्ध निधीतून शहरातील सर्व रस्ते टप्प्याटप्प्याने काँक्रिटचे केले जाणार आहेत. तसेच डांबरी रस्त्यांवरील मोठे खड्डेदेखील 'काँक्रिटचे व्हाइट टॅपिंग करून बुजविले जातील.

ठेकेदाराने रस्ता पूर्ण केल्यानंतर त्या रस्त्यांची गुणवत्ता आयआयटी पवई, व्हीजेटीआय आणि के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ज्ञांकडून तपासून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.