Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: गुड न्यूज; बाह्यरिंगरोड पाठोपाठ 190 किमी इनर रिंगरोड

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) बाह्यरिंगरोड (Outer Ring Road) करण्याचे प्रस्तावित केल्यानंतर आता नाशिक महापालिकेनेही (NMC) शहराच्या अंतर्गत रिंगरोड करण्याचे नियोजन सुरू केले आहे.

नाशिकमध्ये दर बारावर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा (Kumbha mela) होतो. या कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक पर्वणीसाठी नाशिकमध्ये येतात. या भाविकांसाठी सोईसुविधा उभारणे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते उभारणे यासाठी नाशिक महापालिकेकडून मोठे नियोजन केले जाते. आताही सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या पाच वर्षांवर येऊन ठेपला असून, महापालिकेकडून बारकाईने नियोजन सुरू आहे.

नाशिक शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बाह्यरिंगरोड करण्याचे प्रस्तावित केल्यानंतर आता नाशिक महापालिकेनेही शहराच्या अंतर्गत रिंगरोड करण्याचे नियोजन सुरू केले आहे. साधारणपणे नाशिक शहरातून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय मार्गांना जोडणारे १९० किलोमीटरचे रिंगराड करण्याचे नियोजन असून त्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या अंतर्गत रिंगरोडमुळे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी मध्यवस्तीतून जाण्याची गरज पडणार नाही व वाहतूक कोंडी टळण्यास मदत होणार आहे.

नाशिक व त्र्यंबकेश्‍वर या दोन ठिकाणी गोदावरीच्या काठी सिंहस्थ कुंभमेळा होतो. यात देशभरातून आलेले भाविक त्र्यंबकेश्‍वरला जाताना नाशिक शहरातून जातात. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होते. त्याचप्रमाणे शहरात काम नसलेली वाहनेही शहरातून जात असतात. त्यासाठी महापालिकेने दहा हजार कोटी रुपयांच्या खर्चातून ६० किलोमीटरचा बाह्यरिंगरोडे प्रस्तावित केला असून त्याचे काम महारष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वानुसार केले जाणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहराचा विकास झपाट्याने होत असून शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी प्रत्येकवेळी शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असतात. त्यामुळे मागील सिंहस्थात महापालिकेने अंतर्गत रिंगरोड उभारले. त्याचा फायदा बघून या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नवीन अंतर्गत रिंगरोड विकसित करणे व काही ठिकाणी जुन्या रिंगरोडची रुंदी वाढवणे प्रस्तावित केले आहे.

या अंतर्गत रिंगरोडच्या विस्तारिकरणासाठी जवळपास दहा हजार वृक्षांवर कुऱ्हाड चालवावी लागणार असल्याचा अहवाल समोर आला आहे. यामुळे उद्यान विभाग व बांधकाम विभाग एकत्रितपणे पाहणी करणार आहेत. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. नाशिक शहरातील १९० किलोमीटरचे अंतर्गत रिंगरोड विकसित करण्यासाठी तीनशे कोटींचा खर्च येणार आहे. या प्रस्तावित रिंगरोडचा संपूर्ण आराखडा तयार करण्याच्या हालचाली बांधकाम विभागाने सुरू केल्या आहेत. महापालिकेने मागील सिंहस्थात नव्वद किलोमीटरचा अंतर्गत रिंगरोड विकसित केले होते. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने विकास आराखडा तयार करताना १९० किलोमीटरच्या अंतर्गत रिंगरोडचा समावेश करून निधी मागणीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवा जाणार आहे.

असे होतील इनर रिंग रोड
नाशिक - पुणे, नाशिक - मुंबई, दिंडोरी रोड, पेठ रोड, त्र्यंबकेश्वर मार्ग, नाशिक - औरंगाबाद या राष्ट्रीय व राज्य महामार्गांना शहरातील प्रत्येक भागातून थेट जाता येईल, असे अंतर्गत रिंगरोड केले जाणार आहे. यामुळे सिंहस्थ काळात वाहनांची संख्या वाढली, तरी त्या त्या भागात जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग राहणार असून त्यामुळे वाहतुकीवरी भार कमी होण्यास मदत होणार आहे.