Simhastha Maha Kumbh Mela, nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: त्रयस्थ संस्थेच्या अहवालाशिवाय सिंहस्थ कामांच्या देयकांना ब्रेक

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात जवळपास २३ हजार कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. त्यातील जवळपास १२ हजार कोटींची कामे सुरू झाली आहेत. ही कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी कुंभमेळा प्राधिकरणने त्रयस्थ संस्थेची नेमणूक केली आहे.

या संस्थेकडून प्रत्येक कामाचे मोजमाप, गुणवत्ता तपासणी केली जाणार आहे. या त्रयस्थ संस्थेच्या अहवालाशिवाय एकाही कामाचे देयक दिले जाणार नाही, असे कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करण्यासंदर्भात विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी नुकताच आढावा घेतला. यावेळी डॉ. गेडाम यांनी सिंहस्थ कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता कामे निर्धारित निकषांनुसार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीस नियोजन विभागाचे सहसंचालक बाबुलाल पाटील, योगेंद्र चौधरी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता बारावकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, राहुल पाटील, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आदी अधिकारी उपस्थित होते. 

सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित अनेक कामे सध्या सुरू आहेत. इगतपुरी तालुक्यातील एका रस्ता कामाला डॉ. गेडाम यांनी दोन महिन्यांपूर्वी अचानक भेट देऊन तपासणी केली. त्यावेळी त्यांनी रस्त्याच्या कामासाठी वापरलेल्या साहित्याची तपासणी केली होती. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

त्यानंतर नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनीही महापालिका हद्दीतील कामांची अचानकपणे तपासणी केली होती. त्यावेळी महापालिकेच्या संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्याची करवाई केली. या दोन्ही प्रकरणांमधून सिंहस्थाच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

दरम्यान कुंभमेळा प्राधिकरणने सिंहस्थातील कामांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठीटीयुव्ही एसयुडी साऊथ अशिया प्रा. लि. या त्रयस्थ संस्थेची नियुक्ती केली आहे. कुंभमेळा अनुषंगाने विविध विभागांकडून हाती घेण्यात आलेल्या कामांची गुणवत्ता, मोजमाप नोंदी, करारनामे, देयके आदी कागदपत्रांची पडताळणी टीयुव्ही एसयुडी साऊथ अशिया प्रा. लि. या त्रयस्थ संस्थेकडून केली जाणार आहे. संस्थेला आयआयटीबी आणि अन्य तज्ज्ञ संस्थांचे सहकार्य राहणार आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व कार्यान्वयन यंत्रणा व अंमलबजावणी अभिकरणांनी आवश्यक कागदपत्रे संस्थेकडे वेळेत उपलब्ध करून द्यावीत. या संस्थेकडून कामांच्या गुणवत्तेबाबत अहवाल प्राप्त झाल्याशिवाय देयक दिले जाणार नाही, असे कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्पष्ट केले आहे. त्रयस्थ संस्थेच्या ऑडिट दरम्यान काही त्रुटी आढळून आल्यास त्या तत्काळ दूर करण्याच्याही सूचना डॉ. गेडाम यांनी दिल्या.