नाशिक (Nashik): सिंहस्थ आराखड्यातील कामांना आधी उशिरा मिळालेली मंजुरी व त्यानंतर भूसंपादनातील अडचणी यामुळे ही कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण होण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत प्रस्तावित व सुरू असलेली सिंहस्थ आराखड्यातील सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक होतील यावर अधिक भर देत कामांना गती द्यावी व गरज पडल्यास रात्रीची कामे सुरू ठेवा, पण कामे वेळेत पूर्ण करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या सिंहस्थ आराखड्यातील नाशिक त्र्यंबकेश्वर या प्रमुख रस्त्यासह त्र्यंबकेश्वरवला जोडणा-या इतर राज्य मार्ग, जिल्हा मार्ग यांच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक कार्यालयात आढावा बैठक घेतली.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, उपवनसंरक्षक (पश्चिम) सिद्धेश सावर्डेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, सार्वजनिक बांधकाम विभाग संभाजीनगरचे अधीक्षक अभियंता विवेक माळुंजे, दक्षता व गुणवत्ता नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र कंकरेज, कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे, मुकेश ठाकूर आदी उपस्थित होते.
भोसले म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळादृष्टीने करण्यात येणारी सर्व कामे दर्जात्मक होण्यासाठी त्रयस्थ पक्षाकडून कामांची वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणानेही त्यांच्या स्तरावर या कामांची त्रयस्थ पक्षाकडून तपासणी करावा व कामे गुणवत्तापूर्वक होतील यासाठी दक्ष राहावे, अशी सूचना त्यांनी दिली. कोणतीही अडचण नसलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. वन विभाग व जलसंपदा विभाागने रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी. ठेकेदारांनीही विहित मुदतीत कामे पुर्ण करण्यावर अधिक भर द्यावा.
पहिल्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे तसेच रात्रीच्या वेळीही कामे सुरू ठेवावीत, अशा सूचना देतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी कामे विहित मुदतीत पूर्ण न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचाही इशारा दिला.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता तयार करताना सुशोभिकरणावर भर द्यावा. तसेच ठिकाठिकाणी भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने लावण्यात येणारे दिशादर्शक फलक यांच्या आकारात एकसमानता असावी, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी सिंहस्थ कुंभमेळा आराखड्यातील नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील प्रस्तावित व मंजूर कामांची माहिती दिली. आयुक्त शेखर सिंह यांनी त्र्यंबकेश्वर व नाशिक येथील कुंभमेळा प्रस्तावित आवश्यक परवानग्या व त्याबाबत करावयाची कार्यवाही याबाबत चर्चा केली. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी या कामांसाठी आवश्यक भूसंपादनाबाबत माहिती दिली.
अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीबाबत आराखड्याद्वारे सादरीकरण केले. तसेच प्रत्येक कामासाठी नियुक्त केलेल्या संस्था व ठेकेदार यांच्याशी कामांबाबत असलेल्या अडीअडचणींबाबत मंत्री भोसले यांनी चर्चा केली.