नाशिक (Nashik): नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणने प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांबाबतची टेंडर प्रक्रिया संबंधित कार्यान्वयीन यंत्रणाच राबवत असतात. मात्र, आता सिंहस्थाला वर्षभरापेक्षा कमी कालावधी उरला असताना कुंभमेळा प्राधिकरणने काही कामांची अंमलबजावणी स्वत:च करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणामध्ये टेंडरसेल स्थापन करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेच्या महासभेत प्राधिकरणने उशिरा प्रशासकीय मान्यता दिल्याने कामे उशिरा सुरू झाल्याचे सांगून कुंभमेळा प्राधिकरणवर खापर फोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यातूनच कुंभमेळा प्राधिकरणने स्वत:च टेंडर राबवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरत असतो. या सिंहस्थात मोठ्या संख्येने येणा-या भाविकांसाठी सरकारकडून मोठ्याप्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जातात. त्यामध्ये रस्ते, पूल, घाट, सांडपाणी व्यवस्थापन, मलनिस्सारण केंद्र, रेल्वेस्थानक उभारणी, विमानतळ सुविधा, साधुग्राम, वाहनतळ, वीज उपकेंद्र, मोबाईल टॉवर आदी कामे केली जातात. ही कामे करणा-या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी जवळपास ४२ कार्यान्वयीन यंत्रणा असून त्यांचा समन्वय साधून कामे अधिक दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावित यासाठी महाराष्ट्र सरकारने कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली.
कुंभमेळा प्राधिकरणाने आतापर्यंत जवळपास १६ हजार कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या असून त्यातील बहुतांश कामांच्या टेंडर प्रक्रिया संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांनी राबवल्या आहेत. कुंभमेळा प्राधिकरणानेही आतापर्यंत राज्याच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून टेंडर प्रक्रिया राबवल्या असून त्या प्रामुख्याने स्वच्छेशी संबंधित वस्तूंचे दर मागवणे, सिंहस्थ काळात गर्दी व्यवस्थापनासाठी ॲप तयार करणे, संकेतस्थळ विकसित करणे, नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील घाटांवर सौंदर्यीकरण करण्यासाठी दर मागवणे या स्वरुपाच्या कामांचा समावेश आहे.
यात संबंधित पुरवठादारांकडून केवळ दर मागवण्यात आले असून त्या दरांच्या आधाराने अंदाजपत्रक तयार करणे, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता देणे या बाबी बाकी आहे. यामुळे ही कामे पुढे नेण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने स्वत:चा टेंडरसेल तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे कुंभमेळ्याशी संबंधित असलेली व कोणत्याही अंमलबजावणी यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात नसलेल्या कामांची अंमलबजावणी प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यासाठीच हा टेंडरसेल स्थापन केला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने जिल्हा परिषदेकडून चार कर्मचारी तात्पुरत्या नियुक्तीने घेतले असून त्यात तीन कनिष्ठ प्रशासन अधिकारी व एक कनिष्ठ सहायक यांचा समावेश आहे.
तात्पुरत्या सुविधांची कामे करणार
नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाने स्वतंत्र टेंडरसेल स्थापन करण्यामागील हेतु काय आहे, याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना तात्पुरत्या पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी हा टेंडरसेल स्थापन केल्याचे सांगितले आहे. यावरून आगामी काळात साधुग्राममध्ये सुविधा पुरवणे, वाहनतळ उभारणी करणे, स्वच्छतेशी संबंधित आदी कामे कोणत्याही कार्यान्वयीन यंत्रणांकडे न सोपवता ती कामे स्वत: कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाणार असे दिसत आहे.