Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : टेंडर न राबवता जुन्या ठेकेदाराला एलईडी पुरवठा आदेश देण्याचा घाट

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेच्या विद्युत विभागाने ५,००० एलईडी पुरवठ्याचे काम मुदत संपलेल्या जुन्या ठेकेदाराला दिले आहे. विशेष म्हणजे या ठेकेदाराला आधी दिलेल्या कामाची मुदत संपून ते काम पूर्ण झाल्यामुळे नवी टेंडर प्रक्रिया राबवणे गरजेचे असताना जुन्या दराच्या नावाखाली आधीच्या कामाला मुदतवाढ दिली आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागाने या ठेकेदाराला जवळपास एक लाख एलईडी पुरवठा करण्याचे काम दिले होते. जुन्या दराने जुन्या ठेकेदारांना काम देण्याचा महापालिकेत प्रघात पडत चालला असून महापालिका नवीन टेंडर राबवण्यास का घाबरत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

नाशिक महापालिकेच्या विविध सेवांसाठी वेगवेगळ्या विभागांकडून ठेकेदारांन काम दिले जाते. या कामाची मुदत संपल्यानंतरही टेंडर प्रक्रिया राबवली जात नसल्याने जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ दिली जाते. मात्र, महापालिकेत आता नवीन टेंडर वेळेत काढायचे नाही व जुन्यांना मुदतवाढ द्यायची, असा गेल्या काही वर्षांत प्रघात पडला आहे. यामुळे महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी पत्र काढून प्रत्येक विभागाने आपल्या अधिनस्त कामांची मुदत संपण्याच्या किमान तीन महिने आधी टेंडर प्रक्रिया राबवावी, अशा सूचना दिल्या आहेत.

यानंतरही काही विभागांकडून जाणीवपूर्वक टेंडर प्रक्रियेला विलंब केला जात आहे व पर्यायाने जुन्या ठेकेदाराला मुदतवाढ मिळत आहे. आणखी महत्वाचे म्हणजे नवीन टेंडर प्रक्रिया राबवल्यानंतर त्या कामाचे दर वाढतात व महापालिकेचा खर्च वाढतो. यामुळे जुन्या ठेकेदाराला जुन्या दराने काम देऊन महापालिकेची आर्थिक बचत केली जाते, असे त्याला गोंडस नाव दिले जाते.

बांधकाम विभागामार्फत नुकतेच  जेहान सर्कल मार्गावरील गोदावरी पुलाच्या वाढीव कामाला विनाटेंडर साडेसात कोटी रुपयांचे कार्यादेश देताना हाच निकष लावला आहे. त्यानंतर आता स्थायी समितीत प्रस्ताव ठेवून एलईडीच्या जुन्याच पुरवठादाराकडून ५,००० एलईडी खरेदीचा घाट घातला जात आहे.

अजब प्रकार
  टी. पी. ल्युमिनिअर्स या कंपनीने नाशिक शहरात ९९८६४ एलईडी फिटिंग्ज केल्या आहेत. या कंपनीला २० ऑगस्ट २०१९ रोजी पुरवठा आदेश दिल्यानंतर ५ जुलै २०२० रोजी त्यांची कामाची मुदत संपुष्टात आली. मात्र त्यानंतरही ११ सप्टेंबर २०२३ च्या महासभेत याच ठेकेदार कंपनीकडून ५,००० नवीन एलईडी फिटिंग्ज खरेदीसाठी मान्यता घेण्यात आली आहे.

एखादे काम मुदतीत पूर्ण झाले नसेल अथवा एखाद्या कामाच्या ठेकेदाराची मुदत संपत आली असताना नवीन टेंडरपक्रिया पूर्ण झालेली नसल्यास मुदतवाढ देणे समजू शकते. मात्र, जवळपास तीन वर्षांनी जुन्या दरांच्या नावाखाली टेंडर न राबवता जुन्या ठेकेदाराला काम देण्याचा हा अजब प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान टी. पी. ल्युमिनिअर्स यांनी यापूर्वी एलईडी पुरवठा केला आहे. पहिला पुरवठा आदेश जरी संपला असला तरी, चांगले काम असल्यामुळे मुदतवाढ दिली असल्याचे समर्थक महापालिकेच्या विद्युत विभागाकडून केले जात आहे.