Gulabrao Patil
Gulabrao Patil Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: गुलाबराव पाटलांच्या हस्ते 2560 कोटीच्या योजनांचे भूमीपूजन

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) व नाशिक जिल्हा परिषदेचा (Nashik ZP) ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनी जलजीन मिशन (Jal Jeevan Mission) अंतर्गत कार्यारंभ आदेश दिलेल्या १७६४ पाणी पुरवठा योजनांचे ई-भूमीपूजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या हस्ते करण्यात आले.

मिशन जलजीवनमधून ग्रामीण पाणी पुरवठा विभाग १,२२२ योजना व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ३८ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना उभारत आहेत. साधारणपणे २,५६० कोटी रुपयांच्या निधीतून या योजना मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

प्रत्येक कुटुंबाला घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन या योजनेचा प्रारंभ केला आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात आधीच अस्तित्वात असलेल्या योजनांमधून सर्व घरांना जळ जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यानंतर नळपाणीपुरवठा योजना नसलेल्या प्रत्येक गावाला व गावातील प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नळाद्वारे पाणी पुरवले जाणार आहे.

यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १३५६ गावांसाठी १२८२ पाणी पुरवठा योजना तयार करून त्यांचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनेही नाशिक जिल्ह्यात ३८ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. या ३८ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून ४०८ गावांमधील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी मिळणार आहे.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या १२८२ योजनांसाठी १४४३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या ३८ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी १११७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

सौरविजेसाठी प्रयत्न
भविष्यात वीजबील भरण्याच्या कारणावरून या पाणीपुरवठा योजना अपयशी ठरू नयेत, यासाठी या सर्व पाणीपुरवठा योजना सौरवीज प्रकल्पावर चालवण्याबाबत पाणी पुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. सर्व ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठ्याचे वीजबील एकाच ठिकाण रुपांतरीत करता येईल व त्यासाठी सौर प्रकल्प उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करण्याबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

या योजनांची कामे ग्रामपंचायतींनी जलद पूर्ण करावीत, गतीने व दर्जेदार काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना जलदूत पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याचेही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

येवला नांदगावला सर्वाधिक निधी
(तालुका : निधी (कोटीमध्ये))


बागलाण : १९५.०८
चांदवड : १०४.७
देवळा : ६१.३
दिंडोरी : १६९.४४
इगतपुरी : १६०.३२
कळवण : ११५.७४
मालेगाव : १७०.०४
नाशिक : १२१.५७
नांदगाव :  ३०५.९४
निफाड : १८४.६७
पेठ : ११६.०८
सिन्नर : २१०.४२
सुरगाणा : १६२.९६
त्रिंबक : १६९.३४
येवला : ३०३.८८