nashik, dwarka chowk Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Dwarka Chowk Nashik: नाशिककरांना दिलासा! द्वारका चौकातील वाहतूक 5 महिन्यांनंतर...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा काळात शहरातील मध्यवर्ती असलेल्या द्वारका चौकातील वाहतूक गेल्या सहा महिन्यांपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असलेला द्वारका चौकातील मार्ग अखेर हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला. भूयारी मार्गाच्या एका स्लॅबचे काम पूर्ण झाल्याने धुळे-मुंबई व मुंबई-धुळे या मुख्य मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे मुंबईनाका मार्गाने पंचवटीत जाणा-या वाहनचालकांसह शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा मार्ग केवळ हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिक शहरात मोठ्यासंख्येने भाविक येणार असल्याने द्वारका चौकातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्रालयाने २१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून द्वारका चौक येथे पुणे बाजूकडे जाणाऱ्या अंडरपासच्या बांधकामाला फेब्रुवारीत सुरुवात करण्यात आली आहे.

या काठे गल्ली सिग्नल ते सारडा सर्कल या अंडरपासच्या बांधकामामुळे होणारी वाहतूक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी द्वारका चौकात अवजड वाहने, खासगी प्रवासी बसेस, एसटी बसेस तसेच सिटीलिंक बसेस यांना १८ जुलैपर्यंत प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या अंडरपास प्रकल्पाचे सुमारे ३० ते ४० टक्के काम पूर्ण झाले असून, द्वारका हॉटेल ते द्वारका बसस्टॉप दरम्यानच्या तीनपैकी पहिल्या स्लॅबचे काम पूर्ण झाल्याने हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.  धुळे ते मुंबई आणि मुंबई ते धुळे या दोन्ही दिशांकडील हलकी वाहने आता थेट मुख्य मार्गावरून जाऊ शकतील.

हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाल्याने काठे गल्ली, शंकरनगर, टाकळी गाव, वडाळा रोड, पखाल रोड, जुने नाशिक आणि आडगाव नाका या भागांकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सोयीचा झाला आहे. यामुळे मुख्य उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतुकीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आता सुधारित अधिसूचना जारी करीत द्वारका चौकातील सर्व बाजूंनी येणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आले आहे. सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

काम लांबले
द्वारका चौकातील अंडरपासचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाने ठेकेदाराला दिले होते. मात्र, ते काम वेळेत पूर्ण न झाल्याने ठेकेदारास तीन महिन्यांची मुदतवाढ देत १८ जुलैपर्यंत काम पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, जुनच्या मध्यापर्यंत या अंडरपासचे काम केवळ ४० टक्के पूर्ण झाले आहे.

यामुळे हे काम पूर्ण करण्यास आणखी किमान सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी लागणार आहे. मात्र, त्या काळामध्ये आणखी काही मार्गावरील वाहतून अंशता सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.