Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : स्मार्टसिटीचे CCTV एप्रिलखेरीस कार्यान्वित न झाल्यास ठेकेदाराविरोधात गुन्हा; पोलिस आयुक्तांची तंबी

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : स्मार्ट सिटी (Smart City) अंतर्गत शहरातील मुख्य चौकांसह सिग्नलवर सीसीटीव्ही लावण्यासाठीचे टेंडर (CCTV Tender) देऊन चार वर्षे उलटून व काम पूर्ण करण्याची मुदत संपून वर्ष झाले, तरी अद्याप सीसीटीव्ही कार्यान्वित झालेले नाहीत. यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित ठेकेदाराची (Contractor) कानउघडणी केली आहे.

काम पूर्ण करण्याची मुदत संपून वर्ष होऊनही काम पूर्ण न झाल्याने एप्रिल अखर सीसीटीव्ही सुरू न झाल्यास थेट गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे. यामुळे या महिनाखेरपासून शहरातील सर्व सिग्नलवर वाहनांसाठी ई चलान कारवाई सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

स्मार्टसिटी योजनेतून नाशिक शहरात सर्विलन्स, वाहनांच्या नंबरप्लेट व रात्रीच्या वेळी प्रतिमा घेऊ शकणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे ३७१ ठिकाणी ८०० कॅमेरे बसवले जाणार आहेत. तसेच ५० ठिकाणी वायफाय, २० ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टिम, २६ ठिकाणी पर्यावरण सेंसर व २० ठिकाणी पूर सेंसर उभाऱण्यात येणार आहे.

केंद्र व राज्याच्या सूचनेनुसार १५९ कोटींचे हे काम महाआयटी या कंपनीला चार वर्षापूर्वी दिले असून ते काम पूर्ण करण्यासाठी मार्च २०२३ ची मुदत देण्यात आली होती. सीसीटीव्ही बसवण्यासाठी शहरातील ३७१ ठिकाणे निश्चित केली असून तेथे ७१२ फिक्स बॉक्स कॅमेरे तर ८८ झूम कॅमेरे बसवले जाणार आहे. यातही १५९ ठिकाणी २७८ फिक्स बॉस कॅमेरा इतर ३४ ठिकाणी पॉईंट झूम कॅमेरे बसवण्यात आले आहे.

यात शहरातील सिग्नलवर ६६ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आल्या होत्या. त्यादृष्टीने शहर शहर पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीत तळमजल्यावर जून २०२३ मध्ये नियंत्रण कक्ष 'अपडेट' करण्यात आला. तिथे शहरातील सर्व सीसीटीव्हींचा एकत्रित 'फीड' मिळणे अपेक्षित आहे. मात्र, याठिकाणी सीबीएस, मेहेर व अशोक स्तंभ वगळता इतर चौकांतील सीसीटीव्हींचा 'फीड' मिळत नाही.

याशिवाय ई-चलान कारवाई सुरू करण्यासाठी शहरांमधील सिग्नलवरील सीसीटीव्ही अद्याप सुरू केलेले नाहीत. विशेष म्हणजे पोलिस आयुक्तालयाने पोलिस अंमलदारांना सीसीटीव्हीच्या आधारे कायदेशीर कारवाई, बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाईसाठी प्रशिक्षणही दिले आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून सीसीटीव्ही टेंडरमधील घोटाळा उघड झाल्याने त्याची चौकशी सुरू असल्याने कामाचा वेग मंदावला आहे.

या सर्व घडामोडीत पोलिसांनी तयारी करूनही सीसीटीव्हींअभावी पोलिसांच्या कार्यपद्धतीला खोळंबा होत असल्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या मुदतीपूर्वी म्हणजे एप्रिलअखेरपर्यंत शहरातील सर्व सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यासंदर्भात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबंधित ठेकेदाराला तंबी दिली आहे.