Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: कोरोना काळातील कोट्यवधीचे ऑक्सिजन निर्मितीप्रकल्प भंगारात?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक शहर व जिल्ह्यातील (Nashik City & District) कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत नगण्य झाल्यामुळे नााशिक महापालिकेने (NMC) शहरातील सर्व कोव्हिड सेंटर (Covid Patients) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या कोव्हिड सेंटरसाठी उभारण्यात आलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प (Oxygen Plants) भांडारगृहात जमा केले जाणार आहेत.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत नाशिक शहरात कोरोना बाधीत रुग्णांसाठी ऑक्सिजनची टंचाई भासत असल्यामुळे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून २४४ मेट्रिकटन क्षमतेचे प्रकल्प उभारले होते. आता कोरोना बाधीत रुग्ण नसल्याने कोव्हिड सेंटर बंद केले असून त्यासाठीचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आता बिनकामाचे ठरले आहेत.
 

महापालिका गेल्या तीन वर्षांपासून करोना प्रतिबंधक उपाययोजना व कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रयत्न करीत आहे. त्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या आरोग्य विभागाचा कस लागला. त्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची प्रचंड कमतरता भासली. त्यावेळी नाशिकमधील रुग्णालयांना दिवसाला १०० मेट्रिक टन ऑक्सिनची गरज असताना त्याची पूर्तताही खासगी प्रकल्पांमधूनही होत नव्हती. यावर उपाय म्हणून महापालिकेने तिसऱ्या व चौथ्या लाटेची शक्यता गृहित धरून शहरात कोव्हिड उपचार केंद्रांची संख्या वाढवण्याबरोबरच प्रत्येक कोव्हिड उपचार केंद्रावर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारून त्यांची क्षमता दिवसाला २४४ मेट्रिक टनपर्यंत वाढवली होती.

महापालिकेने खासगी ऑक्सिजन पुरवठादारांवर अवलंबून न राहता कोव्हिड सेंटर्सच्या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे स्वतःचे २३ ऑक्सिजन प्रकल्प उभारले होते. यात प्रामुख्याने ठक्कर डोम येथील ३२५ खाटांच्या कोव्हिड उपचार केंद्रासाठी ६०० लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे तीन, स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे ५०० लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे दोन, छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम येथील ३०० खाटांच्या कोव्हिड उपचार केंद्रासाठी ५०० लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे दोन, तसेच अंबड येथील ५०० खाटांच्या कोव्हिड उपचार केंद्रासाठी ५०० लिटर प्रतिमिनिट क्षमतेचे तीन ऑक्सिजन प्रकल्प उभारले.

नाशिक महापालिकेने कोरोना महामारीचा सामना करण्याची पूर्ण तयारी केली असताना नाशिक शहरात तिसऱ्या व चौथ्या लाटेचा काहीही प्रभाव आढळून आला नाही. यामुळे प्रकल्प उभारताना ती गरज वाटत असली, तरी आता महापालिकेसाठी तो कोट्यवधीचा खर्च वाटत आहे. आता कोरोना रुग्णांची संख्या घटली असून त्यात रुग्णालयात उपचार घेणे व ऑक्सिजनची गरज असणारे रुग्ण जवळपास शून्य आहेत. यामुळे महापालिकेने सर्व कोव्हिड उपचार केंद्र गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कोव्हिड उपचार केंद्रांना टाळे लावले असून आता हे सर्व प्रकल्प भांडारगृहात जमा करण्यात येणार आहे. हे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आता वापरात राहणार नसल्याने पुढच्या काही दिवसामंध्ये त्यांना भंगारात काढावे लागणार असल्याने महापालिकेने केलेले कोट्यवधींचा खर्च वाया जाणार असल्याचे बोलले जात आहे.