Kumbh Mela
Kumbh Mela Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: 2 रिंगरोडसाठी शिंदे सेनेच्या मंत्री-खासदारांमध्ये स्पर्धा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारीसाठी नाशिक महापालिकेने नाशिक शहराबाहेरून आधीच एका रिंगरोडचा (Ring Road) प्रस्ताव तयार केला असताना खासदार हेमंत गोडसे यांनीही सिंहस्थ परिक्रमा नावाने दुसरा रिंगरोड प्रस्तावित केला आहे.

या सिंहस्थ परिक्रमाचा आराखडा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) तयार केला असून यासाठी साधारणपणे दोन हजार कोटींचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक महापालिकाही त्यांनी प्रस्तावित रिंगरोडचे काम रस्ते विकास महामंडळाकडून करण्याबाबतचा प्रस्ताव पुढील आठवड्यात सादर करणार आहे.

यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नाशिक शहराभोवती दोन रिंग रोड उभारले जाणार असे दिसत आहे. मात्र, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व खासदा हेमंत गोडसे यांच्याकडून नाशिक शहराबाहेरून दोन वेगवेगळे रिंग उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्यामुळे त्यात कोणता रिंगरोड मंजूर होणार याबाबत उत्सुकता आहे.

नाशिक महापालिकेने आगमी सिंहस्थ - कुंभमेळ्यात शहरातील संभाव्य वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नाशिक महापालिका हद्दीलगत ५६ किलोमीटर लांबीचा रिंगरोड प्रस्तावित केला आहे. या रिंगरोडसाठी दहा हजार कोटींचा निधी लागणार असल्याचा अंदाज असल्यामुळे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनुसार हा रिंगरोड रस्ते विकास महामंडळाने उभारावा, असा प्रस्ताव पुढील आठवड्यात नाशिक महापालिका सादर करणार आहे.

दरम्यान नाशिक महापालिका हद्दीबाहेरून आणखी एक बाह्यरिंगरोडचा प्रस्ताव खासदार हेमंत गोडसे यांनीही रस्ते विकास महामंडळाने सादर केला होता. खासदार गोडसे यांनी केलेल्या सूचनांनुसार रस्ते विकास महामंडळाने हा सिंहस्थ परिक्रमा (बाह्य रिंगरोग) उभारण्यासाठी भूसंपादनासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार सिंहस्थ परिक्रमा मार्ग ७० किलोमीटरचा होणार आहे. त्याची रुंदी ६० मीटर आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

शहराच्या आजूबाजूला औद्योगिक वसाहत वाढत असल्याने त्यामुळे रस्त्यावर वाहनांची अधिकची भर पडत असते. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान रोज हजारो वाहने शहरात दाखल होणार आहेत. यातून निर्माण होणारी वाहतुकीची समस्या टाळण्यासाठी सिंहस्थ परिक्रम मार्ग उपयोगाचा ठरणार असल्याचे खासदार गोडसे यांचे म्हणणे आहे.

हा सिंहस्थ परिक्रमा मार्ग जानोरी फाटा, सय्यद पिंपरी, लाखलगाव, जाखोरी, शिंदे, विंचूर दळवी, साकुरफाटा, वाडीव-हे, खंबाळे, महिरावणी, दुगाव, गिरणारे, रामशेज, आंबे- दिंडोरी, असा असणार आहे.

खासदार गोडसे यांनी रस्ते विकास महामंडळाला दोन वर्षापूर्वी या सिंहस्थ परिक्रमासाठी प्रस्ताव दिल्याचे सांगितले जात आहे, तर वर्षभरापूर्वी पालकमंत्री झाल्यापासून दादा भुसेही नाशिक महापालिकेने प्रस्तावित केलेल्या रिंगरोडसाठी आग्रही आहेत. त्यांना आता सार्वजनिक बांधकाम खाते मिळाल्यामुळे त्यांनी नाशिक महापालिकेने प्रस्तावित केलेला रिंगरोड रस्ते विकास महामंडळाकडून करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नेमके त्याचवेळी खासदार गोडसे यांनी सिंहस्थ परिक्रमा मार्गाचा आराखडा तयार झाल्याची माहिती दिली आहे. यावरून एकाच पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये नाशिकच्या रिंगरोडबाबत सुप्तस्पर्धा असल्याचे समोर आहे.