Nashik, Ghoti Trimbakeshwar Road, Farmers Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: घोटी-त्र्यंबकेश्वर महामार्गाचे काम सिंहस्थापूर्वी करण्याचे आव्हान; भूसंपदानास विरोध

विरोध झुगारून पीडब्ल्यूडीच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पोलिस बंदोबस्तात जमीन मोजणीला प्रारंभ

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मुंबईमार्गे त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी केंद्रिय रस्ते विकास मंत्रालयाकडून घोटी ते त्र्यंबकेश्वर (आंबोली घाट) या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचे (क्र. १६० ए) काम सिंहस्थापूर्वी पूर्ण करायचे आहे. या चौपदरी महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध असून, या भूसंपादनाला विरोध करण्यासाठी घोटी येथे शेतकऱ्यांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे.

या रस्त्याच्या मोजणीशिवाय या ४८ किलोमीटर लांबीच्या या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयाल होणार नाही व त्याशिवाय या रस्ता कामाला प्रशासकीय मान्यता देऊन टेंडर प्रक्रिया राबवता येणार नाही. यामुळे सिंहस्थापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, यासाठी सर्व विरोधाला झुगारून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने पोलिस बंदोबस्तात जमीन मोजणीला प्रारंभ केला आहे. मात्र, सिंहस्थ अवघा दीड वर्षावर येऊन ठेपला असून, अद्याप या रस्त्याचे भूसंपादन झालेले नसल्याने वेळेत काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग दर्शनासाठी मुंबईहून मोठ्यासंख्येने भाविक येत असतात. त्याचप्रमाणे ब्रह्मगिरी, अंजनेरी, हरिहर या पर्वतांवर जाण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. आता मुंबईवरून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नाशिकहून जावे लागते. घोटीवरून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी एक रस्ता असला तरी तो एकेरी रस्ता असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याचा वापर होत नाही. याशिवाय याच भागात पावसाळ्यात निसर्ग सहलींसाठी मुंबईहून मोठ्याप्रमाणावर पर्यटक येत असले, तरी चांगला रस्ता नसल्याने पर्यटकांची गैरसोय होऊन त्याचा पर्यटनावर परिणाम होत असतो.

याशिवाय २०२७ मध्ये त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत असून या सिंहस्थासाठी मुंबईवरून येणाऱ्या भाविकांना विद्यमान रस्ता अपुरा पडणार असल्याने हा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी घोटी-पालघर या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून, तो महामार्ग वाढवण बंदराला जोडला जाणार आहे.

त्यातील नाशिक जिल्ह्यातील घोटी ते आंबोली घाट या रस्त्याचे चौपदरीकरण नाशिक विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा राष्ट्रीय महामार्ग विभाग करणार असून उर्वरित महामार्गाचे काम ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे.

नाशिक जिल्ह्यात या मार्गाची लांबी ४८ किलोमाटर असून या रस्त्यासाठी साधारणपणे २२.५ मीटर भूसंपादन केले जाणार आहे. म्हणजे या मार्गासाठी साधारणपणे २२५ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.

केंद्रिय रस्ते विकास मंत्रालयाने या भूसंपादनासाठी नोटीसा पाठवल्यानंतर संबंधित जमीन धारकांनी विरोध करून आंदोलन सुरू केले असले, तरी वाढवण बंदरासाठी हा महामार्ग महत्वाचा असल्याने त्याचे काम होण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आग्रही असून सिंहस्थापूर्वी त्याचे काम पूर्ण करण्यावर ठाम आहे. यामुळे पोलिस बंदोबस्तात जमीन मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

या रस्त्याची नाशिक जिल्ह्यातील लांबी ४८ किलोमीटर असून त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठीच साधारण ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सार्वजनिक बांधकामच्या महामार्ग विभागाने केंद्रिय रस्ते विकास मंत्रालयास कळवले आहे. आता मोजणी झाल्यानंतर या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्यानुसार टेंडर प्रक्रिया राबवली जाईल. मात्र, त्यात भूसंपादन हा मोठा अडथळा आहे. भूसंपादन प्रक्रियेला किती वेळ लागतो, यावर हा रस्ता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आत पूर्ण होणार की त्याचे काम लांबणार हे स्पष्ट होणार आहे.

विरोधकांचे काय आहे म्हणणे?

या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनास विरोध करणाऱ्या जमीन धारकांनी दोन्ही बाजूंनी जास्तीत जास्त पंधरा मीटर रुंदीचे भूसंपादन करावे, अशी मागणी केली आहे. इगतपुरी तालुक्यात आधीच धरणांसाठी, संरक्षण विभागासाठी मोठ्याप्रमाणावर भूसंपादन झाले असून समृद्धी महामार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग, रेल्वेमार्ग यासाठीही भूसंपादन झाले आहे. यामुळे या तालुक्यातील शेतक-यांची जमीन धारणस्थिती कमी झालेला आहे. यामुळेही या भूसंपादनाला विरोध होत असल्याचे दिसत आहे.

दृष्टीक्षेपात महामार्ग १६० ए

  • घोटी-आंबोली घाट अंतर : ४८ किलोमीटर

  • रस्ता रुंदी : 45 मीटर

  • प्रकल्प किंमत : अंदाजे ७०० कोटी रुपये