Rope Way Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवे उभारणीबाबत काय आली महत्त्वाची अपडेट?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): जिल्हा प्रशासनाने बहुप्रतीक्षित अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवे प्रकल्प सिंहस्थापूर्वी उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्र्यंबकेश्वरजवळील पेगलवाडी येथे थेट खरेदीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यासाठीचे गटही निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे मागील तीन वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागला आहे.

या रोपवे प्रकल्पात त्र्यंबकेश्वरजवळील पेगलवाडीलगत मुख्य केंद्र उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ३.१५ हेक्टर भूसंपादन करावे लागणार असून त्यातील पेगलवाडी येथील २.०४२४ हेक्टर (५.०५ एकर) क्षेत्र संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी प्रक्रिया राबवण्याची तयारी सुरू केली आहे.

हा प्रकल्प केंद्र सरकारच्या नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून उभारला जाणार आहे.

त्र्यंबकेश्वर परिसरातील अंजनेरी आणि ब्रह्मगिरी हे दोन्ही पर्वतांचे पौराणिक व भौगोलिक महत्व असून भाविकांची या दोन्ही ठिकाणी आस्था आहे. गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतावर झालेला असून अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. मात्र, हे दोन्ही पर्वत अतिउंचावर असल्याने मनात असूनही भाविक आणि पर्यटक सहजपणे त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत.

भाविकांना अंजनेरी आणि ब्रह्मगिरीवर जाणे सोपे व्हावे यासाठी अंजनेरी -ब्रह्मगिरी या पर्वतांना जोडणारा रोप वे प्रास्तवित केला होता. भारत सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीकडून साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी जवळपास ३७६.७३ कोटींच्या या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून जुलै २०२३ मध्ये त्याची टेंडर प्रक्रिया राबवली गेली.

या प्रकल्पामुळे पर्यावरणीय कारणांमुळे पर्यावरणवादी कार्यकर्ते व स्थानिकांनी या प्रकल्पाला व त्याच्या टेंडरलाही विरोध केला होता. यावर तोडगा काढण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी तेथील पर्यावरणीय अभ्यासासाठी त्रयस्थ समिती नेमली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व अन्य दोन संस्थांनी या संदर्भातील निष्कर्ष जाहीर करण्यात आले नसले, तरी जिल्हा प्रशासनाने आता गिधाडांचे अधिवास असलेला अंजनेरी पर्वताचा भाग वगळून पेगलवाडी जवळील पर्वतावरून हा रोपवे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. पूर्वीप्रमाणे नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केले जाणार आहे. सर्व्हेनुसार या रोपवेसाठी पेगलवाडी, त्र्यंबकेश्वर व मेटघर येथे ३ हेक्टर १५ गुंठे क्षेत्र भूसंपदीत करावे लागणार आहे. पूर्वी या रोपवे ची लांबी ५.७ किलोमीटर होती. आता त्यात बदल केल्यामुळे ती लांबी चार किलोमीटर च्या आसपास होणार आहे.

या रोपवे प्रकल्पात त्र्यंबकेश्वरजवळील पेगलवाडीलगत मुख्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी येथील २.०४२४ हेक्टर अर्थात ५.०५ एकर क्षेत्र संपादित असून करण्यात येणार इगतपुरी-त्र्यंबकेश्वरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू केली आहे. जमीन मालकांची मालकी हक्कांसंदर्भात हरकत असल्यास ती १५ दिवसांत नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कोणतीही हरकत न आल्यास संबंधित शेतकऱ्यांकडून थेट वाटाघाटींद्वारे हे क्षेत्र संपादित केले जाईल. यानंतर त्र्यंबकेश्वर व ब्रह्मगिरीवरील मेटघर येथील उर्वरित क्षेत्राची संपादन प्रक्रिया राबवली जाईल.