Nashik Ring Road
Nashik Ring Road Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : बाह्यरिंगरोडचा प्रस्ताव एमएसआरडीसीकडून अमान्य?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू केली असून मुलभूत सुविधांचा आराखडा तयार केला आहे. दरम्यान मागील काही महिन्यापासून बाह्यरिंगरोड अर्थात सिहंस्थ परिक्रमा मार्ग उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ( एमएसआरडीसी)  बाह्य रिंग रोडचा सर्व्हे सुरू असून त्यातून या रिंगरोडसाठी लागणारा खर्च विचारात घेता हा रिंगरोड अव्यवहार्य असल्याचे समोर आल्याची चर्चा आहे. या रिंगरोडचा वापर केवळ सिंहस्थ काळातच होणार असून त्यानंतर त्यावरून त्याप्रमाणात वाहने धावणार नाहीत. यामुळे केवळ सिंहस्थासाठी एवढा मोठा खर्च करण्यास रस्ते विकास महामंडळाची तयारी नसल्याचे बोलले जात आहे. परिणामी महापालिकेने प्रस्तावित केलेला बाह्यरिंग रोडच्या प्रस्तावाचा गाशा गुंडाळल्याची चर्चा आहे.

महापालिकेकडून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची पूर्वतयारी सुरू झाली असून प्रारुप आराखड्यातील कामे निश्चितीचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान महापालिकेने सुरवातीला शहराबाहेरून साठ किलोमीटरचा रिंगरोड करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यासाठी बाधिताना भूसंपादनाच्या बदल्यात वाढिव टीडीआरचा मोबदला देण्यास परवानगी मिळण्याबाबत शासनाला पत्र पाठवले होते. तसेच महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या बाह्य रिंगरोडसाठी दहा हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. यासाठी राज्य सरकारने पैसे द्यावेत, अशी महापालिकेची भूमिका होती.

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी या बाह्यरिंगरोडचे काम एमएसआरडीसीने करावे, अशी मागणी विधानसभेत केली व त्याबाबत राज्य शासनाने तयारीही दर्शवली. दरम्यान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या विभागाचा कारभार आला आहे. यामुळे त्यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाने केलेल्या सर्व्हेची माहिती घेत रस्ते विकास महामंडळाला याबाबत सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी या वळण रस्त्याला सिंहस्थ परिक्रमा असे नावही दिले. या विभागाकडून सध्या सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी दहा हजार कोटी खर्च अपेक्षित आहे.  पुण्यासारख्या शहरात आता कुठे बाह्यरिंगरोड होत असून नाशकात अजून तरी त्याची आवश्यकता नाही, असा सरकरमध्ये मतप्रवाह असल्याचे बोलले जात आहे.

शहराबाहेरून येत असलेल्या वाहनांची गर्दी नियंत्रणात रहावी हा रिंगरोडचा उद्देश आहे, पण सिंहस्थ कालावधी सोडला तर या मार्गाचा वापर होण्याची शक्यता फार कमी आहे. शिवाय या मार्गासाठी तब्बल दहा हजार कोटींचा खर्च येणार आहे. हा खर्च वसूल करण्यासाठी या मार्गावर टोल आकरावा लागणार आहे. मात्र, या मार्गावरून जाऊ शकणाऱ्या वाहनांची संख्या त्या प्रमाणात नसल्याने खर्च वसूल करणे अशक्यप्राय असल्याचे समोर आले आहे. यामुळे या रिंगरोडसाठी केंद्र किंवा राज्य सरकारकडून निधी मिळवणे हा एकमेव पर्याय आहे. मात्र, आधीच महापालिकेने आठ हजार कोटींचा प्रारुप आराखडा तयार केला असून साधुग्रामच्या भूसंपादनासाठीही चार हजार कोटींची गरज आहे. त्यात आणखी दहा हजार कोटी रुपयांचा निधी मिळणे अशक्य असल्याने तुर्तास बाह्यरिंगरोडचा विषय मागे पडला असल्याचे बोलले जात आहे.
 
 प्रस्तावित बाह्य रिंग रोड
• नांदूर नाका ते जत्रा हॉटेल लिंक रोड

• सातपूर-अंबड लिंक रोड

• गंगापूर- सातपूर लिंक रोड

• बिटको विहीतगाव-देवळाली रोड