Kumbh Mela Tendernama
उत्तर महाराष्ट्र

‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027’; मेअखेरपर्यंत सर्व टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : प्रयागराज महाकुंभाच्या धर्तीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा-२०२७ सुरक्षित, नियोजनबद्ध व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी व्यापक उपाययोजना तातडीने राबवाव्यात. भाविकांच्या सुविधांसाठी राबविण्यात येणारी सर्व कामे वेळेत पूर्ण होण्याची काळजी घ्यावी, तसेच मेअखेरपर्यंत सर्व टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिले.

बैठकीत विविध विभागांनी सादर केलेल्या कामकाजाच्या अहवालाचा आढावा घेत महाजन यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. 'निव्वळ योजना न मांडता त्यांची प्रभावी अंमलबजावणी करा, वेळापत्रकानुसार कामे पूर्ण करा आणि भाविकांची अडचण होणार नाही, याची विशेष काळजी घ्या,' असे त्यांनी बजावले.

रिंग रोडला गती द्या-

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने रस्ते बळकटीकरण, वाहतूक नियोजन आणि शहरातील संपर्क सुलभ करण्यासाठी रिंग रोड तयार करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या सहकार्याने ही रिंग रोड योजना राबविली जाणार आहे. यामुळे नाशिक शहराची कनेक्टिव्हिटी वाढेल आणि गर्दीचे व्यवस्थापन सोपे होईल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

अकरा नवीन पुल उभारणार-

नाशिक शहरात ११ नवीन पुलांची योजना आखण्यात आली असून, महापालिकेने यातील दोन पुलांना मंजुरी देत टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. उर्वरित पुलांसाठीही लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती मंत्री महाजन यांनी दिली. याशिवाय शहरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यालाही मंजुरी मिळाली आहे. महाजन यांनी स्पष्ट केले, की कुंभमेळ्याच्या तयारीसाठी निधीची कोणतीही अडचण भासणार नाही. सिंहस्थ आराखडा अंतिम झाल्यानंतर केंद्र सरकारकडे निधीसाठी पाठपुरावा केला जाईल व आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. या आढावा बैठकीस आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, तसेच त्र्यंबकेश्वर नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. श्रिया देवचक्के यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.