MGNAREGA, Rural development, worker Tendernama
उत्तर महाराष्ट्र

7 महिन्यांची प्रतीक्षा संपली; मनरेगा मजुरांच्या खात्यात थेट 1409 कोटी जमा होणार

Maharashtra MGNREGA Update: केंद्राकडून १४०९ कोटी निधी; नाशिक जिल्ह्याला ४५.६२ कोटी; ऑगस्ट २०२५ पासून थकीत मजुरीचा प्रश्न सुटणार; निधी थेट मजुरांच्या खात्यात जमा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) महाराष्ट्रातील मजुरांसाठी केंद्र सरकारने १४०९ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. गेल्या सात महिन्यांपासून रखडलेली मजुरी आता ४ मार्चपासून थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या निधीतून नाशिक जिल्ह्यातील मजुरांना सुमारे ४५.६२ कोटी रुपये मिळणार आहेत.

महाराष्ट्रातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) मजुरांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्राच्या ग्रामविकास विभागाने राज्यासाठी १४०९ कोटींचा निधी वितरित केला असून यामुळे गेल्या काही महिन्यांपासून थकीत असलेली मजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऑगस्ट २०२५ पासून राज्यातील मनरेगा कामांवरील मजुरांची मजुरी थकली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो मजुरांना सात महिन्यांपासून त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नव्हता. अखेर केंद्र सरकारने फेब्रुवारी अखेरीस निधी मंजूर केल्यानंतर ४ मार्चपासून ही रक्कम मजुरांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मनरेगा योजनेतून ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार देण्याची तरतूद आहे. या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे कुशल, अर्धकुशल आणि अकुशल असे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी कुशल आणि अकुशल कामांचे प्रमाण ६०:४० असे निश्चित करण्यात आले आहे.

मात्र अनेक ठिकाणी या प्रमाणाचे पालन न झाल्याचे प्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारने निधी रोखण्यासारख्या कारवाया केल्या. तसेच कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मजुरांची हजेरी ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली. काही भागांत मोबाईल नेटवर्क नसल्याने ऑनलाइन हजेरी नोंदवण्यात अडचणी येत असल्याचीही तक्रार आहे.

मंजूर निधीत अनुसूचित जातींच्या मजुरांसाठी १११ कोटी, अनुसूचित जमातींसाठी १६८ कोटी आणि इतर मजुरांसाठी ११२८ कोटींचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यास या निधीतून ४५.६२ कोटी उपलब्ध झाले आहेत. मात्र रोजगार हमीच्या कुशल कामांसाठीचा सुमारे ५४.७४ कोटींचा निधी अद्याप प्रलंबित असल्याने संबंधित व्हेंडर्सना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

महत्त्वाचे मुद्दे...

• महाराष्ट्रातील मनरेगा मजुरांसाठी ₹१४०९ कोटी निधी
• ७ महिन्यांपासून थकीत मजुरीचा प्रश्न सुटणार
• निधी थेट मजुरांच्या बँक खात्यात जमा
• अनुसूचित जातींसाठी ₹१११ कोटी, अनुसूचित जमातींसाठी ₹१६८ कोटी
• नाशिक जिल्ह्यास ₹४५.६२ कोटी निधी
• कुशल कामांचा ₹५४.७४ कोटी निधी अद्याप प्रलंबित