Uday Samant
Uday Samant Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : महिंद्रा करणार अडीच ते पाच हजार कोटींची गुंतवणूक

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीचा दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला महिंद्रा इलेक्ट्रिकलचा प्रकल्प पुण्यात होणार असला तरी महिंद्राच्या नाशिक प्रकल्पाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. या विस्तारीकरणासाठी अडीच ते पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती देत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिंद्राच्या इ़लेक्ट्रिकल प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर विधानसभेत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

विधिमंडळ अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी महिंद्राचा ईव्ही (इलेक्ट्रिकल व्हेईकल) प्रकल्प नाशिकऐवजी पुण्यातील चाकण येथे स्थलांतरित झाला का, असा प्रश्न विधानसभेत विचारला होता. त्यावेळी उद्योगमंत्री सामंत यांनी चाकणला प्रकल्प होत असल्याचे उत्तर दिले होते. नाशिकमधून प्रकल्प जाणार असल्याने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. त्यावर भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात पॉइंट ऑफइन्फॉर्मेशनच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला.

महिंद्राचा इलेक्ट्रिक व्हेईकलचा प्रकल्पहा नाशिकला होणार आहे का? येत्या काळात नवीन प्रकल्प नाशिकमध्ये होणार का, अशी विचारणा त्यांनी सभागृहात केली. त्यावर उद्योगमंत्री सामंत यांनी उत्तर दिले की, महिंद्रा कंपनी पुण्यात गुंतवणूक करत आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही गुंतवणूक करणार असून महिंद्रा कंपनी विस्तारीकरणासाठी अडीच ते पाच हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली. मंत्री सामंत यांनी सांगितले की, महिंद्रचे दोन प्रकल्प आहे. दाओसमध्ये सामंजस्य करार झाला तो दहा हजार कोटींचा प्रकल्प असून तो पुणे येथील चाकण येथे उभारला जाणार आहे. नाशिकमधील प्रकल्पाचे देखील विस्तारीकरण होणार आहे. तेथे अडीच ते पाच हजार कोटींची गुंतवणूक आहे. त्यामुळे नाशिकमधील प्रकल्प स्थलांतरित झालेला नाही.