नाशिक (Nashik) : सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीमध्ये एका बंद उद्योगाच्या जागेचे ६० तुकडे करून ते विक्री करण्याच्या प्रस्तावाला महिनाभरात परवानगी देण्याच्या प्रकाराविरोधात उद्योगांनी आक्रमक भूमिका घेतली. एकीकडे उद्योगांना सुविधा मिळण्यासाठी महिनोनमहिने निर्णय घेतला जात नसताना याबाबत एवढी गतीशिलता कशी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
दरम्यान नाशिकमधील अंबड, सातपूर येथील बंद पडलेल्या उद्योगांच्या जागेचे तुकडे करून विक्री प्रकरणात एमआयडीसी अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात असतानाच त्यांनी सिन्नरलाही तोच प्रकार केल्यामुळे संतप्त उद्योजकांनी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकार्यांना विचारणा केली आहे. यावर प्रादेशिक अधिकारी यांनी माघार घेत या भूखंडाचे तुकडे करण्याचा प्रस्ताव रद्द करण्याबाबत मुख्यालयास कळवण्याच आश्वासन दिले.
अंबड, सातपूर, अक्राळे तसेच सिन्नर येथील उद्योजकांना सतावणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात नाशिक व सिन्नर येथील उद्योजकांनी प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांची भेट घेतली. यावेळी एकीकडे सात महिन्यांपासून वीज उपकेंद्रासाठी जागेची मागणी करूनही ती मिळत नाही. मात्र, दुसरीकडे मोठ्या उद्योगांचे तुकडे करून विक्री तत्काळ केली जाते यामागील उद्देश काय असा संतप्त सवाल 'निमा'चे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. आक्रमक झालेल्या उद्योजकांची भूमिका बघून प्रादेशिक अधिकारी गवळी यांनी संबंधित जागेचे तुकडे करून विक्री करण्यास स्थगितीचा प्रस्ताव तातडीने मुख्यालयाला पाठवणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे उद्योजकांचे समाधान होऊन त्यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्वच औद्योगि वसाहतींमधील समस्यांबाबत चर्चा केली.
अंबड येथील फ्लॅटेड बिल्डिंगमधील गाळे तसेच अक्राळे येथील छोट्या भूखंडांच्या वितरणासाठी जाहिरात काढण्यात येईल, असे केवळ आश्वासन दिले जात असून त्याची कार्यवाही होत नाही. यामुळे प्रतीक्षेत असलेल्या लघुउद्योजकांची कुचंबणा होत असल्याची उद्योजकांनी तक्रार केली. त्याचप्रमाणे अंबडमध्ये ४०० गाळ्यांची इमारत तयार होऊन पाच वर्षांचा कालावधी उलटूला आहे. त्यानंतरही ते गाळे उद्योगांना उपलब्ध करून दिले जात नसल्याची तक्रार कण्यात आली. या तक्रारींची दखल घेऊन अंबडचे फ्लॅटेड गाळे व अक्राळे येथील भूखंडांची विक्रीसाठी लवकरच प्रक्रिया पूर्ण करून उद्योगांना जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन प्रादेशिक अधिकारी गवळी यांनी दिले.