Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Davos: नाशकात 'ही' कंपनी करणार मोठी गुंतवणूक; तब्बल 2 हजार रोजगार

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : स्वित्झर्लंडच्या दावोस (Davos, Switzerland) येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या (WEF) तिसऱ्या दिवशी झालेल्या सामंजस्य करारानुसार नाशिकमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूह (Mahindra And Mahindra) इलेक्ट्रिक वाहन (Electric Vehicles) उद्योगाचे विस्तारीकरण करण्यासाठी सहा हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

या गुंतवणुकीमुळे नाशिकमध्ये दोन हजार जणांना रोजगार मिळणार आहे. या गुंतवणुकीमुळे नाशिक येथे इलेक्ट्रिक वाहनांसाठी भारतीय बनावटीच्या स्पेअरपार्ट निर्मिती उद्योगालाही चालना मिळू शकणार असल्याने नाशिक येथील उद्योजकांनी या गुंतवणुकीचे स्वागत केले आहे.

दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत सहभागी झाले होते. या परिषदेद्वारे महाराष्ट्रात सुमारे एक लाख ४० हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांशी सामंजस्य करार झाल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. पहिल्या दोन दिवसांच्या सामंजस्य करारामध्ये कोठेही नाशिकमधील गुंतवणुकीचा उल्लेख नव्हता. तिसऱ्या दिवशी मात्र, त्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश नसल्याने उद्योजकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.

नाशिकवर सततचा अन्याय का, असा सवाल विचारला जात होता. मात्र, तिसऱ्या दिवशी उद्योगमंत्री सामंत यांनी दावोस येथून ऑनलाइन पत्रकार परिषद घेऊन आणखी काही प्रकल्पांची घोषणा केली. त्यात 'महिंद्र'च्या इलेक्ट्रिक व्हेइकल प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा उद्योग समूहाकडून महाराष्ट्रात दहा हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

त्याचा विस्तार नाशिकमध्ये केला जाणार असून त्यात सुमारे सहा हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. त्या माध्यमातून दोन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. यामुळे नाशिकच्या उद्योगविश्वातून सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.