नाशिक : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (MWRRA) या संस्थेने जलसंपदा विभागाच्या जलाशयांमधून शेती, घरगुती व व्यापारी कारणासाठी देण्यात येणाऱ्या दरांमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ केली आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका सिंचनासाठी पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने याबाबत जुलैमध्येच निर्णय घेतला असला, तरी आता रब्बी पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांकडून पाणी मागणी अर्ज भरताना ही नवी दरवाढ शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे. या नव्या दरवाढीमुळे रब्बी पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ७५० ऐवजी १५०० रुपये मोजावे लागणार आहेत. या अव्वाच्या सव्वा सिंचन व घरगुती वापराच्या पाणीपट्टीत झालेली वाढ पोटात गोळा आणणारी असली तरी अद्याप कोणत्याही राजकीय पक्ष अथवा सामजिक संस्थांनी प्रतिक्रिया व्यक्त न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणे यापूर्वी २०१८ मध्ये जलसंपदा विभागाकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या दरांचा आढावा घेऊन नवीन दर जाहीर केले होते. त्यानंतर यावर्षी १८ जुलैस नवीन दर जाहीर केले असून हे दर पुढील तीन वर्षांसाठी लागू राहणार असल्याचे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने स्पष्ट केले असून यासाठी १ जुलै ते ३० जून असा एक वर्षाचा कालावधी गृहित धरला जाणा आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने सिंचन, घरगुती व व्यापारी वापर या तीन प्रकारांमधील दर जाहीर केले असून त्यातही ठोक दर व वैयक्तिक लाभार्थी असे वेगवेगळे दर जाहीर केले आहेत. याशिवाय उपसा सिंचन, प्रवाही सिंचन, पाणी वापर संस्था, ग्रामपंचायती, महानगर पालिका यांच्यासाठीचेही नवीन दर जाहीर केले आहेत. या नवीन दरांचा व २०१८ मधील दरांचा विचार केल्यास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने जवळपास दुप्पट वाढ केल्याचे दिसत आहे. घरगुती वापरासाठीचे दरवाढीपेक्षा सिंचनाच्या दरीवाढीचा शेतकऱ्यांना थेट फटका बसणार आहे. यापूर्वी शेतकरी एक एकर सिंचनासाठी ७५० रुपये पाणीपट्टी देत होते, तिच्यात जवळपास दुप्पट वाढ होणार असून शेतकऱ्यांना एक हेक्टर सिंचनासाठी १५०० रुपये मोजावे लागणार आहे.
अशी आहे दरवाढ
पाणी वापर संस्था रब्बी दर (मध्यम प्रकल्प)
यापूर्वी एक हजार लिटर पाण्यासाठीचे दर ५.८५ पैशांवरून वाढून ते ११ पैसे झाले आहेत.
...
पाणी वापर संस्था रब्बी दर ( मोठे प्रकल्प)
यापूर्वी एक हजार लिटर पाण्यासाठीचे दर ७.३१ वरून वाढून ते १३ पैसे झाले आहेत.
...
वैयक्तिक शेतकरी (रब्बीचे दर)
यापूर्वी एक हेक्टर सिंचनासाठी ७५० रुपये असणारे दर १५०० रुपये झाले आहेत.
...
ग्रामपंचायत
यापूर्वी एक हजार लिटर पाण्यासाठी ०.१५ पैसे असलेले दर आता ०.३० पैसे झाले आहेत.
...
नगर पालिका
यापूर्वी एक हजार लिटर पाण्यासाठी ०.१८ पैसे असलेले तर आता ०.३५ पैसे झाले आहेत.
...
महानगर पालिका
यापूर्वी एक हजार लिटर पाण्यासाठी ०.२५ पैसे असलेले तर आता ०.५५ पैसे झाले आहेत.