नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिक-पुणे महामार्गावरील द्वारका सर्कल ते दत्त मंदिर या अत्यंत वर्दळीच्या ६.४ किलोमीटर रस्त्याचे १० पदरी रुंदीकरण करण्याचे नाशिक महापालिकेचे नियोजन अडचणीत आले आहे. १७७ कोटी रुपयांच्या या टेंडरमध्ये सहभागी झालेल्या सात आघाडीच्या कंत्राटदार कंपन्यांनी १२ महिन्यांची मुदत अपुरी असल्याचे सांगत पावसाळ्याचे ४ महिने वगळून १६ महिन्यांची मुदत देण्याची मागणी केली आहे.
नाशिक-पुणे महामार्गावरील द्वारका सर्कल ते दत्त मंदिर या ६.४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नाशिक महापालिकेने १७७ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. मात्र, या रस्ता कामासाठी अद्याप १७ हजार चौरस मीटर क्षेत्राचे भूसंपादन बाकी आहे. ते भूसंपादन वेळेत झाले नाही, तर या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यात अडचणी येतील.
तसेच पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीमुळे बांधकामाशी संबंधित वस्तुंचे दर वाढल्याने दर वाढून मिळतील का, असे दोन मुद्दे या कामाच्या टेंडरमध्ये सहभागी झालेल्या सात कंत्राटदार कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केले आहेत.
याशिवाय या रस्ते कामासाठी दिलेल्या १२ महिन्यांच्या मुदतीतून पावसाळ्याचे चार महिने वगळण्याची मागणी केली आहे. महापालिकेच्या या टेंडरमध्ये मुंबई, पुणे आणि नाशिक येथील सात बांधकाम कंपन्यांनी टेंडर दाखल केले आहेत. टेंडरपूर्व बैठकीत संबंधित कंत्राटदारांनी भूमिका मांडली.
सिंहस्थ कुंभमेळानिमित्ताने नाशिक शहरात येणा-या सर्व प्रमुख रस्त्यांच्या कामांचे टेंडर प्रसिद्ध झाले असून काही रस्त्यांच्या कामांना सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यात द्वारका ते नाशिकरोड या रस्त्याचे कामास केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून निधी मिळावा म्हणून महापालिकेकडून प्रयत्न सुरू होते.
अखेर केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने या रस्त्याच्या कामास मंजुरी दिली. त्यानंतर महापालिकेने या महिन्यात तिस-यांदा ६.४३५ किलोमीटर लांबीच्या दहा पदरी ४५ मीटर रुंदीच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
टेंडरमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख १ जून असून, तांत्रिक लिफाफा २ जून रोजी उघडण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत सध्या २५ मीटर रुंदीचा असलेला रस्ता ४५ मीटरपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूंना प्रत्येकी ७.५ मीटर रुंदीचे दुहेरी सर्व्हिस रोड आणि २.५ मीटर रुंदीचे पदपथ उभारण्यात येणार आहेत, ज्यामुळे पादचा-यांची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल.
द्वारका सर्कल ते दत्त मंदिर मार्ग नाशिकमधील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक आहे. हा रस्ता नाशिकरोड परिसराला मुख्य शहराशी जोडतो तसेच पुणे, शिर्डी आणि सिन्नर औद्योगिक पट्ट्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे.
सिंहस्थापूर्वी म्हणजे पुढीलवर्षी जूनपर्यंत या रस्त्याचे दहापदरी काम करण्यासाठी नाशिक महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले असून त्याची टेंडरपूर्व बैठक नाशिक महापालिकेत झाली. यावेळी कंत्राटदारांनी पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीमुळे बांधकाम साहित्यांच्या किंमतीत होणाऱ्या चढ-उतारांचा मुद्दा उपस्थित केला.
या वाढीव खर्चाचा समावेश करारामध्ये केला जाणार आहे का, अथवा त्यासाठी स्वतंत्र भरपाई दिली जाणार का, याबाबत त्यांनी स्पष्टता मागितली. तसेच भूसंपादन वेळेत पूर्ण न झाल्यास प्रकल्प रखडण्याची शक्यता असल्याने त्याच्या कालमर्यादेबाबतही प्रश्न उपस्थित केले.
या बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी वाढीव सुमारे ५० हजार चौरस मीटर जमिनीची आवश्यकता असून त्यापैकी २० हजार चौरस मीटर जमीन नाशिक महापालिकेकडे आधीपासून उपलब्ध आहे, तर १३,५०० चौरस मीटर जमीन विविध शासकीय संस्थांच्या ताब्यात आहे, असे स्पष्ट केले.
उर्वरित १७ हजार चौरस मीटर खासगी मालकीची जमीन ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स् (टीडीआर) या पद्धतीतून संपादित केली जात असल्याची माहिती दिली. संबंधित जमीनमालकांना जमीन हस्तांतरित करण्यासाठी नोटिसाही बजावण्यात आल्याची माहिती देत, बिडधारकांना आश्वस्त केले. काम पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या एका वर्षाच्या मुदतीतून पावसाळ्यातील चार महिने वगळावेत, अशी मागणीही कंत्राटदारांनी केली.
मुसळधार पावसामुळे कामाच्या अंमलबजावणीत अडचणी निर्माण होतात, असे त्यांचे म्हणणे होते. याशिवाय बांधकामामध्ये एकसमानता राखण्यासाठी तांत्रिक तपशीलांबाबत अधिक स्पष्टता देण्याची मागणीही करण्यात आली. यावर महापालिका अधिका-यांनी वरिष्ठांशी बोलून याबाबत निर्णय होईल, असे स्पष्ट केले आहे.