Nashik City, nmc Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: वर्षभरापूर्वी 19 कोटी खर्च केलेल्या सुस्थितीतील द्वारकाचौक ते नाशिकरोड रस्त्यावर 177 कोटींचे डांबरीकरण

द्वारका चौक ते नाशिकरोड या दहापदरी मार्गाचे काम सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी नाशिक महापालिकेने तिसरे टेंडर प्रसिद्ध

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): नाशिक शहरातील द्वारका चौक ते नाशिकरोड या दहापदरी मार्गाचे काम सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी नाशिक महापालिकेने तिसरे टेंडर प्रसिद्ध केले आहे. या कामाची कर वगळता किंमत १७७ कोटी ७४ लाख रुपये असून या मार्गावर नासर्डीवरील पुलाचे रुंदीकरण हे एकमेव पुलाचे काम होणार आहे. यामुळे द्वारका चौक ते दत्तमंदिर चौक या ६.४ किलोमीटर रस्त्याचे दहा पदरी काम झाल्यानंतरही या मार्गावरील चौकांमधील वाहतूक कोंडीची समस्या कायम राहणार आहे. यामुळे या रस्त्याचे दहा पदरी काम करून नेमके काय साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

त्याचप्रमाणे वर्षभरापूर्वीच १९.४२ कोटी रुपये खर्च करून या मार्गाचे सहापदरी डांबरीकरण झाले असून ते काम सुस्थितीत आहे. तसेच या मार्गाचे वाढीव चारपदरी काम सिंहस्थापूर्वी होण्याची शक्यता फार कमी आहे. याचा विचार केला असता या मार्गासाठी १७७ कोटी रुपये खर्चाचा घाट कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने नाशिक शहरात येणा-या सर्व प्रमुख रस्त्यांच्या कामांचे टेंडर प्रसिद्ध झाले असून काही रस्त्यांच्या कामांना सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यात द्वारका ते नाशिकरोड या रस्त्याचे कामास केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून निधी मिळावा म्हणून महापालिकेकडून प्रयत्न सुरू होते. अखेर केंद्रिय रस्ते विकास मंत्रालयाने फेब्रुवारीत या रस्त्याच्या कामास मंजुरी दिली. त्यानंतर महापालिकेने मार्चमध्ये ६.४३५ किलोमीटर लांबीच्या दहा पदरी ४५ मीटर रुंदीच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध केले.

या टेंडरला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता या कामासाठी तिसरे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या टेंडरनुसार सध्याच्या अस्तित्वात असलेल्या २२ मीटर रस्त्यासह वाढीव २३ मीटर रस्त्याचे काम १२ महिन्यांमध्ये पूर्ण करायचे आहे. या कामामध्ये केवळ नासर्डी नदीवरील पुलांच्या रुंदीकरणाच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

पुढच्या टप्प्यात होणार पुलांची कामे?
 कुंभमेळा शिखर परिषदेत आमदार देवयानी फरांदे यांनी द्वारका ते नाशिकरोड या दहा पदरी रस्त्‍यावर प्रमुख चौकांमध्ये पूल नसल्यामुळे तेथे मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होणार असून एवढा मोठा रस्ता होऊनही वाहतूक कोंडीची समस्या तशीच राहणार असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना याबाबत विचारले असता त्यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने आम्ही प्रस्तवित केलेले पूल रद्द केले आहेत, असे सांगितले. मात्र, आमदार फरांदे यांनी या मार्गावरील प्रमुख चौकांमध्ये पुलांची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी या कामासाठी केंद्रिय मंत्रालय निधी देणार नसेल तर आपण ते काम करू, पण आवश्यक कामे झाली पाहिजेत, असे महापालिका आयुक्तांना सांगितले. यामुळे या मार्गावरील प्रमुख चौकांमध्ये गरजेनुसार पूल उभारण्यास मुख्यमंत्री तयार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या टेंडरमध्ये आमदार फरांदे यांना अपेक्षित असलेल्या पुलांच्या कामांचा समावेश झाला नाही.

याबाबत नाशिक महापालिकेतील बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिका-यांना विचारले असता त्यांनी आम्ही केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाला याबाबत प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्यांनी या मार्गावरील पुलांची कामे दुस-या टप्प्यात करण्यात येतील, असे उत्तर दिले आहे. यामुळे या मार्गावरील पुलांची कामे या टेंडरमध्ये धरण्यात आलेली नाहीत.

व्हाईट टॉपिंगला केंद्राचा विरोध
द्वारका चौक ते नाशिकरोडचा दत्तमंदिर चौक या ६.४ किलोमीटर रस्त्याचे दहा पदरी काम करताना त्यावर व्हॉईट टॉपिंग करण्याचा महापालिकेच्या बांधकाम विभागाचा विचार होता. नाशिक महापालिका हद्दीत सध्या काही प्रमुख रस्त्यांवर व्हाईट टॉपिंगची कामे सुरू आहेत. मात्र, केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्रालयाने व्हाईट टॉपिंगला अनेकदा तडे जातात, असे कारण देऊन महापालिकेला व्हाईट टॉपिंग करण्यास परवानगी दिली नाही. यामुळे या ६.४ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरणच होणार आहे.

वर्षभरापूर्वीच झालेय डांबरीकरण
द्वारका चौक ते दत्तमंदिर या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम (महामार्ग) विभागाने २०२४ मध्ये सहा पदरी डांबरीकरण केले आहे. त्यासाठी १९.४२ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. यामुळे हा रस्ता पूर्वीपेक्षा रुंद झाला आहे. तसेच ते काम अजूनही सुस्थितीत आहे. आता या नवीन टेंडरनुसार दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोनपदरी नवीन रस्ता वाढवण्यात येणार आहे. त्यासाठीचे भूसंपादन अद्याप बाकी आहे.

भूसंपादनाला लागणारा वेळ लक्षात घेता वाढीव चारपदरी रस्ताकाम वर्षभरात करणे ही अवघड बाब आहे. यामुळे सिंहस्थापर्यंत केवळ सहा पदरी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम केले जाणार असल्याचे समजते. वाढीव चारपदरी रस्‍त्याचे काम सिंहस्थानंतरच होऊ शकणार आहे. यामुळे सुस्थितीत असलेल्या सहा पदरी मार्गासाठी आणखी १७७ कोटींचा खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.