Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : डीपीसीच्या पाच टक्के निधीतून तहसीलला मिळणार नवी इमारत

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जिल्हा नियोजन समितीला प्राप्त निधीच्या पाच टक्के निधी सरकारी कार्यालय उभारणे, देखभाल, दुरुस्ती व सुविधा निर्माण करण्यासाठी वापरण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे येत्या आर्थिक वर्षात या निधतून सरकारी कार्यालयांचे प्रश्‍न सोडवण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी आढावा बैठकीत दिल्या. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील इमारती नसलेल्या तहसील कार्यालयांना नवीन इमारती मिळू शकणार आहे.

नाशिक तालुक्यातील तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जुन्या इमारतीत अडगळीच्या ठिकाणी आहे. यामुळे या निधीतून प्राधान्याने नाशिक तहसील कार्यालयाचे नियोजन सुरू असून गडकरी चौकाजवळील प्राप्तीकर विभागाच्या समोर सरकारी गुदामाच्या जागेवर नवीन तहसील कार्यालय उभारले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयतील सूत्रांकडून समजले.

आगामी अर्थसंकल्पाची पूर्वतयारी म्हणून राज्याच्या अर्थमंत्र्यांकडून ऑनलाईन पद्धतीने जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक झाली. त्यापार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी विभागातील पाचही जिल्ह्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा नियोजन समित्यांना प्राप्त निधीतील पाच टक्के निधी हा शासकीय कार्यालयांच्या इमारतींच्या देखभाल- दुरुस्ती व सुविधा पुरवण्यासाठी वापरता येणार आहे. तसेच गरज भासल्यास या निधीतून नवीन इमारत बांधण्यासाठीही निधी दिला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. त्यानुसार हा पाच टक्के निधी खर्च करकण्याचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिली.

या आर्थिक वर्षाचे केवळ दोन महिने उरले असल्याने तसेच या निधीचे नियोजनही झाले आहे. यामुळे पुढील आर्थिक वर्षासाठी पाच टक्के निधीचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान पाचही जिल्ह्यांमध्ये सरकारी कार्यालयांना इमारतींबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नाशिक जिल्हानियोजन समितीला या आर्थिक वर्षात सहाशे कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. पुढील वर्षीही साधारण तितकाच निधी प्राप्त होणे अपेक्षित आहे. यामुळे या निधीतून जिल्ह्यातील तहसील कार्यालयांचा प्रश्‍न सोडवण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे विभागातील नगर, धुळे, जळगाव व नंदूरबार येथील जिल्हा नियोजन समित्यांनाही त्यांनी याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच नाशिक तहसील कार्यालयाची इमारत आहे. ही इमारत अडगळीच्या जागेत असून इमारत जुनी असल्यामुळे या कार्यालयासाठी पुरेशी जागाही उपलब्ध नाही. यामुळे वर्षानुवर्षे नाशिक तहसील कार्यालयाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. यामुळे या पाच टक्के निधीतून पाच टक्केचा निधी हा शासकीय दुरावस्था झालेल्या इमारतीसाठी खर्च करण्याच्या सुचना दिल्या. साधारण १२ ते १६ कोटीच्या निधीतून नाशिकची तहसिल कार्यालयाची नवी इमारत करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयाने केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या इमारतीसाठी निधी अपुरा ठरत असल्यास २०२३- २४ या आर्थिक वर्षात तसेच गरज पडल्यास २०२४-२५ अशा वर्षाचा निधी गृहित धरून नवीन इमारतीचा विषय मार्गी लावण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नाशिक तहसीलप्रमाणेच सटाण्यातही तहसील कार्यालयाला नवीन इमारतीची गरज असल्याचे समजते. त्यानुसार माहिती मागवली जात असल्याचे समजते.

नाशिक तहसील इमारत
नाशिक तहसिल कार्यालयाची इमारत अडगळीच्या जागेवर आहे. बंद इमारतीशेजारील इमारतीत तहसिल कार्यालय आहे. त्याऐवजी नवीन शासकीय जागा शोधून त्यावर कार्यालय स्थलांतरीत केल्यास पार्किंगसह इतर अनेक विषय सुटून तालुक्यातील नागरिकांची सोय करता येईल. किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील मोकळ्या जागेतील पडीक इमारती पाडून तसेच तेथील आहे त्या जागेचे योग्य नियोजन करुन तेथेच भव्य इमारत उभारता येईल का याचे नियोजन सुरू आहे.