Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक मनपाचे आणखी एक टेंडर वादात; विशिष्ट कंपनीवर मेहरबानीचा आरोप

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सध्या हायड्रॉलिक शिडी खरेदीचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. मात्र या शिडी खरेदीत अटी शर्ती टाकताना विशिष्ट कंपनीला डोळ्यासमोर ठेवल्याची तक्रार करीत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे महापालिकेचे आणखी एक टेंडर वादात सापडले आहे.

वर्ष भरापासून नाशिक महापालिकेकडून करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची खरेदी सातत्याने वादात सापडली आहे. त्यात आता अग्निशमन दलाच्या आग विझवण्यासाठी आवश्यक असलेल्या हायड्रॉलिक शिडी खरेदीची भर पडली आहे.

टेंडर प्रसिद्ध करताना अग्निशमन विभागाकडूनच नियम व अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्याची तक्रार थेट आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडेच करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आता चौकशी होण्याची शक्यता आहे.

या बाबत तक्रारदारांचे म्हणणे असे आहे की, १४ जुलैस टेंडर प्रसिद्ध झाल्यानंतर टेंडरपूर्व बैठक व त्यावर हरकतीसाठी दहा दिवसांचा कालावधी देण्याचा नियम असताना अवघ्या दोन दिवसांचीच मुदत दिली गेली. ब्रोटो स्कायलिफ्ट ही अग्निशमन व बचावाच्या दृष्टीने ९० मीटर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म पुरवणारी एकमेव कंपनी असून, मुंबई, ठाणे यासह भारतात विविध ठिकाणी ९० मीटरपेक्षा जास्त युनिटस आधीपासूनच अस्तित्वात आहेत. मात्र, अशा प्रकारच्या शिडीचे उत्पादन भारतात न करणाऱ्या विशिष्ट कंपनीला नजरेसमोर ठेवून मनपा अग्निशमन विभागाने अटी-शर्तीमध्ये बदल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या कंपनीने तयार केलेल्या शिडीचे सुटे भागही भारतात उपलब्ध नाहीत. टेंडरमध्ये कंपनी ही संबंधित वस्तूंचे उत्पादन करणारी, पाच वर्षांत १०० युनिटसचा पुरवठा करणारी असावी, अशी अट आहे. महापालिका प्रशासनाने संबंधित कंपनीला ९० मीटर युनिटचे भारतात प्रदर्शन करण्यास सांगावे, असे आव्हान देण्यात आले आहे.

दरम्यान, फायरस्केप कंपनीने अनुभवाच्या दाखल्यात अकोला आणि गोंदियामध्ये निधी एंटरप्राईजेसद्वारे दोन हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मचा पुरवठा केल्याचे म्हटले असून, नाशिक महापालिकेने त्याची शहानिशा करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.