Bullet Train Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Bullet Train: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रखडली, आता बुलेट ट्रेनचा नवा प्रस्ताव?

नाशिककरांना अवघ्या दोन तासांत गाठता येणार मुंबई, पुणे आणि हैदराबाद

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): नाशिक-पुणे या सेमी हायस्पीड ट्रेनचे भवितव्य अंधारात असताना आता ठाणे-नाशिक-पुणे- हैदराबाद या हायस्पीड ट्रेनचा (बुलेट ट्रेन) प्रस्ताव समोर आला आहे. जपान सरकारच्या सहकार्याने अहमदाबाद - मुंबई या हायस्पीड ट्रेनचे काम अंतिम टप्प्यात असताना जपान सरकारने अहमदाबाद - मुंबई - पुणे - हैदराबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाशी नाशिकला फिडर कनेक्टिव्हिटीद्वारे जोडण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर केला आहे.

हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास नाशिककरांना मुंबई, पुणे आणि हैदराबाद ही प्रमुख शहरे अवघ्या दीड ते दोन तासांत गाठणे शक्य होणार आहे. या नव्या हायस्पीड ट्रेनमुळे ठाणे - पुणे - नाशिक असा नवा आर्थिक त्रिकोण आकारास येऊ शकतो.

नाशिक महापालिकच्या मुख्यालयात जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जेआयसीए) आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान (एएफजे) यांच्या पुढाकाराने जपानी सल्लागार टीमची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीस प्रभारी आयुक्त अमित रंजन उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या चर्चेत नाशिकला अहमदाबाद - मुंबई - हैदराबाद हायस्पीड ट्रेन (बुलेट ट्रेन) प्रकल्पाशी जोडण्याच्या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले.

केंद्र सरकारकडून पूर्वी मंजूर झालेला नाशिंक - पुणे हायस्पीड रेल्वेमार्ग रखडल्याने या प्रकल्पाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र, जपानी संस्थांच्या पुढाकारामुळे या संकल्पनेला नव्याने चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून बुलेट ट्रेन नेटवर्कशी नाशिकचा थेट संपर्क प्रस्थापित झाल्यास शहराच्या आर्थिक व पायाभूत विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास प्रभारीआयुक्त अमित रंजन यांनी व्यक्त केला. कृषिपूरक उद्योग, वाइन उद्योग आणि पर्यटन क्षेत्रालाही याचा मोठा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.

बैठकीस असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपानचे अध्यक्ष समीर खाळे, मुख्य समन्वयक अजय देशपांडे, सेईइचिरो अकिमुरा, कोजी यामादा, तसेच जपानचे काझुकी योशिओका, मोतोनोबू शिबुया, नाओतो टाकुमा, तोशिको सायटी, रयोको नाकानो, योइची हरादा, यासुओ इझुमी, तोमोमी सायटो, किनुको मितानी आणि ताकाहिरो मितानी यांच्यासह महापालिकेतील अधिकारी उपस्थित होते.

नाशिकच्या विकासाला चालना
मुख्य हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरशी फिडर कनेक्टिव्हिटीद्वारे जोडणी होऊन मुंबई, पुणे आणि हैदराबादपर्यंतचा प्रवास ९० ते १२० मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. यामुळे ठाणे- पुणे-नाशिक हा प्रादेशिक आर्थिक विकासाचा नवा त्रिकोण तयार होऊन औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळेल.

या हायस्पीड ट्रेनमुळे नाशिक हे उत्तर व मध्य महाराष्ट्रातील महत्त्वाचे लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्यास मदत होईल. वाइन पर्यटन, कृषी प्रक्रिया उद्योग आणि पर्यटन व्यवसायाला मोठी संधी उपलब्ध होईल. पर्यटकांची संख्या वाढल्याने हॉटेल, रिसॉर्ट, रेस्टॉरंट आणि स्थानिक पर्यटन व्यवसायांना चालना मिळेल.