मुंबई (Mumbai): सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशय परिसरातील पर्यटन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पाबाबत उद्भवलेल्या प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी दिली.
राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, दि. ३० सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार प्रकल्पासाठी २८५.७५ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पातही या प्रकल्पासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. प्रकल्पांतर्गत जल पर्यटन, कृषी पर्यटन, विनयार्ड पर्यटन आणि धार्मिक पर्यटन अशा चार घटकांचा समावेश आहे.
चार घटकांपैकी कृषी, विनयार्ड व धार्मिक पर्यटनाच्या कामांना कोणतीही अडचण नसून जल पर्यटनाच्या बाबतीत जलसंपदा विभागाच्या स्वतंत्र धोरणामुळे काही प्रशासकीय समन्वयाची आवश्यकता आहे. उजनी धरणाची मालकी जलसंपदा विभागाकडे असल्याने त्या विभागाची ना हरकत आवश्यक ठरते. त्यामुळे पर्यटन विभाग व जलसंपदा विभाग यांच्यात समन्वय साधून काही प्रकल्प जलसंपदा विभागामार्फत तर काही पर्यटन विभागामार्फत राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही जयस्वाल यांनी सांगितले.
आमदार अभिजित पाटील यांनी उजनी जलाशय परिसरातील पर्यटन विकासासाठी २८२.७५ कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळूनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नसल्याबाबतचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता.