पुणे (Pune) : विरोधक नेहमीच ‘फेक नरेटिव्ह’ पसरवितात. कोणताही उद्योग राज्याबाहेर गेला नाही. महाराष्ट्रात उद्योजकांना कुणी त्रास देत असेल तर त्यांचा बंदोबस्त करू, असे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले.
पुण्यात मंगळवारी (ता.२४) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र हे सर्व जातींना सामावून घेणारे राज्य आहे. त्यामुळे स्थानिक मराठी नागरिकांना त्रास देणाऱ्यांवरही कडक कारवाई करू, असेही सामंत यांनी नमूद केले.
‘राज्यात विविध ठिकाणी उद्योगभवन उभारण्याचे काम हाती घेऊ,’ असे सांगून त्यांनी, उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असल्याच्या विरोधकांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
ते म्हणाले, ‘‘आताच्या विरोधकांच्या सत्तेवरील कार्यकाळात कामे झाली नाहीत. म्हणूनच काही प्रकल्प राज्याबाहेर गेले. चर्चा न झाल्याने त्यांच्याच कार्यकाळात एअरबस सारखा प्रकल्प गमवावा लागला. याबाबत श्वेतपत्रिका का काढण्यात आली नाही....राज्यातील सर्व उद्योगांना संरक्षण देणे आमचे काम आहे. गडचिरोली, मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणूक आणि प्रकल्प आम्ही आणले. माझ्या मतदारसंघात देखील एक मोठा कारखाना येत आहे.’’
सामंत म्हणाले...
- पुणे महापालिकेत शिवसेना सत्तेत येईल असेच काम करू
- पुण्याचा महापौर आमच्या विचाराशिवाय होणार नाही
- पुणे, गडचिरोली, रत्नागिरी, कल्याण डोंबिवली या जिल्ह्यांत टाटा समूहाकडून पाचशे कोटी रुपयांचे प्रकल्प होत आहेत
- पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जवळपास ठरल्या येत्या चार दिवसांत यादी समोर येईल