Pune City
Pune City Tendernama
पुणे

Pune : डोकेदुखी वाढणार; विद्यापीठ चौकात कोंडी वाढणार? कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : ठिकाण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक (SPPU Chwok) (आचार्य आनंद ऋषीजी चौक)... गुरुवारी सकाळी दहाची वेळ...गणेशखिंड रस्त्याने पाषाणकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू होती. पाषाण आणि औंधवरून विद्यापीठ चौकाकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांची नेहमीप्रमाणे वर्दळ होती. परंतु, पुढे सेनापती बापट रस्त्याकडे (Senapati Bapat Road) आणि कॉसमॉस जंक्शनच्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. येत्या काही दिवसांत मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे कोंडीत आणखी भर पडणार आहे. त्यादृष्टीने या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मेट्रो आणि वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा कस लागणार आहे.

अभिमानश्री सोसायटी ते विद्यापीठ चौकदरम्यान बुधवारी (ता. १) प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. आज गुरुवारी नेमकी परिस्थिती आणि वाहतूक कोंडीची कारणे जाणून घेण्यासाठी प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केली. अभिमानश्री सोसायटी ते विद्यापीठ चौक आणि पुढे कॉसमॉस जंक्शनपर्यंत साधारण दोन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी बुधवारी वाहनचालकांना सुमारे दीड तास लागला. तेच अंतर कापण्यासाठी गुरुवारी सकाळी पाच मिनिटे लागली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात पोलिसांकडून योग्य प्रकारे वाहतूक नियमन सुरू होते. चतु:शृंगी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब कोळी, उपनिरीक्षक एम. एस. कालगुडे हे चौकात स्वत: हजर होते. बुधवारी बॅरिकेड लावलेल्या कॉसमॉस जंक्शनवर आजही वाहनांची वर्दळ होती.

कॉसमॉस जंक्शनला पुन्हा बॅरिकेड लावणार
अभिमानश्री सोसायटी ते विद्यापीठ चौकदरम्यान बुधवारी झालेली कोंडी हे मेट्रोने कॉसमॉस जंक्शनजवळ बॅरिकेड लावल्यामुळे झाली होती. मेट्रोने ‘प्रायोगिक तत्त्वावर’ बॅरिकेड लावली होती. परंतु, आता पुन्हा याठिकाणी मेट्रोची कामे सुरू होणार असल्यामुळे पुन्हा बॅरिकेड लावण्यात येणार आहेत. याशिवाय विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचेही कामही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.

विद्यापीठ चौकातील निरीक्षणे
- सकाळी आठ ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत वाहनांची वर्दळ
- रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची धावपळ, रस्ता ओलांडण्यासाठी पुरेसा वेळ हवा
- पादचाऱ्यांध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक, त्यादृष्टीने उपाययोजनांची गरज
- बरेच वाहनचालक सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर उभे
- पाषाणकडून विद्यापीठ चौकात येणाऱ्या रस्त्यावर मेट्रोची कामे धोकादायक पद्धतीने सुरू, वाहनचालकांच्या जीविताला धोका

विद्यापीठ चौकात सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांना बंदी घातली आहे. विद्यापीठ चौकातून सेनापती बापट रस्त्याकडे वळताना या चौकात सिग्नल सुरू करण्यात येणार आहे. तसेच, पुढील दोन दिवसांत मेट्रोच्या कामामुळे कॉसमॉस जंक्शनवर बॅरिकेड लावण्यात येणार आहेत. त्यामुळे कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे.
- बाबासाहेब कोळी, पोलिस निरीक्षक, चतुःशृंगी वाहतूक विभाग