NDA-Padhan Bridge Chandani Chowk
NDA-Padhan Bridge Chandani Chowk Tendernama
पुणे

चांदणी चौकातील पूल पाडताय मगं पाषाण, बावधनच्या नागरिकांनी...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौकातील एनडीए-पाषाण पूल स्फोट करून १० सेकंदांत उडवून देणार; पण हा पूल पडल्यानंतर रोज कोथरूड-पाषाण, बावधन ये-जा करणाऱ्या नागरिकांनी काय करायचे? अनेक जण चांदणी चौकातून उतरून पुलावरून चालत बावधनकडे येतात. या पादचाऱ्यांनी महामार्ग कसा ओलांडायचा? कोकण-मुंबईतून आलेल्यांनी इच्छित स्थळी कसे जायचे? स्थानिकांचा, पादचाऱ्यांचा विचार न करताच थेट पूल पाडायचा निर्णय झाला आहे, अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) पूल पाडण्यासाठीची तयारी सुरू झाली असून, विविध ठिकाणी रस्त्याचे मोजमाप, पर्याय यावर काम सुरू झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर चांदणी चौकातील या कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात एनडीए-पाषाण या महामार्गावरील पुलामुळे केवळ दोनच लेन महामार्गावर उपलब्ध होत आहेत. हा पूल पाडून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करताना चांदणी चौकाच्या परिसरात बावधन, कोथरूड, पाषाण या भागात राहणाऱ्या लाखो नागरिकांचा पुढेच काही महिने प्रचंड वाहतूक कोंडीला, अपुऱ्या पर्यायांमुळे लांबचा वळसा घालून जावे लागणार आहे. केवळ वाहनचालकच नाही तर पादचारी व सार्वाजनिक वाहतुकीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहेत. त्याचा अद्याप विचार वाहतूक नियोजनात झालेला दिसत नाही.

इकडे आड तिकडे विहीर
पाषाण-बावधन परिसरातील अनेक नागरिक नोकरी, व्यवसाय, शाळा, महाविद्यालयासाठी रोज पुण्यात येतात. कोथरूडचे नागरिक चांदणी चौक ओलांडून या भागात जातात. गणेशखिंड रस्त्यानेही पुण्यात येण्याचा पर्याय आहे. पण तिकडे मेट्रो आणि उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात प्रचंड वाहतूक कोंडी असते. त्यामुळे चांदणी चौकातूनच ये-जा करावी लागते. आता चांदणी चौकातील हा पूल पाडल्यानंतर त्याचेही परिणाम भोगावे लागणार आहेत. हा पूल पाडल्यानंतर या भागातील पादचारी चांदणी चौकातील रस्ता कसा ओलांडणार आहेत हे कळत नाही, आमची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी होणार आहे, असे बावधनमधील नागरिक समिधा सणस यांनी सांगितले.

जलवाहिन्यांसाठी लोखंडी पूल
पाषाण-एनडीए पुलावर ४५० मीमी व्यासाच्या दोन जलवाहिन्या आहेत. त्यातून बावधन परिसरात पाणीपुरवठा होतो. पूल पाडण्यापूर्वी या दोन्ही जलवाहिन्यांसाठी पर्यायी लोखंडी पूल बांधला जाईल. त्यावर नवी जलवाहिनी टाकली जाईल व त्यानंतर मुख्य जलवाहिनी जोडून घेऊ. त्यामुळे पूल पाडल्यानंतरही या भागातील पाणी पुरवठाही सुरळीत राहील. त्यासाठी आजच चांदणी चौकात पाहणी केली आहे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

रस्त्यांची मोजणी सुरू
‘एनएचएआय’ने पूल स्फोट करून पाडण्याचे नियोजन केले आहे. पण पूल पाडण्यापूर्वी चांदणी चौकातील विविध रस्‍त्यांची रुंदी, पुलाची रुंदी मोजली जात आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी या चौकात दोन गटांत आज (सोमवारी) काम करत होते. तसेच बावधनकडून कोथरूडला जाण्यासाठी पुलाच्या खालच्या बाजूला डावीकडचा रस्ता मोठा करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे मुळशीकडून येणारा उड्डाण पूल सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

मला कामानिमित्त बावधनला जावे लागते. कोथरूड डेपो येथून रिक्षाने किंवा पिरंगुटच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपी बसने चांदणी चौकात येते. तेथे उतरून चालत रस्ता ओलांडून कामाच्या ठिकाणी जाते. पण आता तर पूल पाडणार असतील तर चांदणी चौकातून पुढे कशी जाऊ, रस्ता कसा ओलांडू. काहीच कळत नाही.
- चंद्रकला जाधव

कोकणातून आलेले प्रवासी चांदणी चौकात उतरल्यावर त्यांना काहीच कळत नाही. या चौकात सगळाच भूलभुलय्या झाला आहे. आमच्याकडे लोक चौकशी करतात. त्यांना जमेल तसा रस्ता सांगून त्यांना बावधनला कसे जाता येईल, वाकडला कसे जाता येईल याची माहिती देतो. पण आता पूल पाडल्यानंतर नागरिक कुठे उतरणार, आम्ही प्रवासी कसे शोधणार हे कळत नाही.
- संदीप, रिक्षाचालक

पर्यायी मार्ग उपलब्ध करून देऊन पूल पाडण्याचे नियोजन केले असते तर या भागात राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला असता. किमान कोथरूडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर उताराचा रस्ता तयार आहे, पण तो वाहतुकीसाठी खुला नाही. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करताना या परिसरात राहणाऱ्या व रोज या चौकातून जाणाऱ्या-येणाऱ्यांचा विचार झाला पाहिजे.
- अभिषेक कुलकर्णी, बावधन

एनडीए-पाषाण पूल पाडल्यानंतर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्याचे नियोजन अद्याप झालेले नाही. वाहतूक पोलिस, पिंपरी-चिंचवड पोलिस, एनएचएआय या सर्व यंत्रणा त्याचे एकत्रित नियोजन करणार आहेत. हे नियोजन करताना पादचाऱ्यांचादेखील विचार केला जाईल.
- राहुल श्रीरामे, उपायुक्त, वाहतूक शाखा