Pune, PMC Tendernama
पुणे

Tender News: 17 कोटींचा खर्च, तरीही पुणे का तुंबले?

PMC: पुणे महापालिकेकडून फक्त ठेकेदारांची बिले काढण्यापूर्वीच स्वच्छता

टेंडरनामा ब्युरो

पुणे (PMC Tender News): पावसाळ्यापूर्वी गटारांची व चेंबरची स्वच्छता केल्यानंतर ठेकेदारांनी पुन्हा त्या ठिकाणी स्वच्छता केलेली नाही. त्यामुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने चेंबरच्या झाकणांवर कचरा अडकून पाणी तुंबत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहेच, पण ठेकेदारांचे व महापालिका प्रशासनाची बेपर्वाई समोर येत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत झालेली कामे केवळ ठेकेदारांची बिल काढण्यापुरतीच स्वच्छता केली का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचू नये, त्याचा त्वरित निचरा व्हावा यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटार टाकल्या जातात. पण शहरात मोठा पाऊस झाला की रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येऊन वाहतुकीचा खोळंबा होतो. पावसाळी गटारांचे, चेंबर्स स्वच्छ केले असे सांगितले जात असले तरी पाणी साचते. शहरात नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी तळी निर्माण झाल्याचा अनुभव पुणेकरांनी घेतला आहे.

पुणे शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात रस्त्यांना नदीचे स्वरूप येत आहे. अनेक ठिकाणी चौकात, रस्त्यांवर गुडघाभर पाणी तुंबत आहे. त्याठिकाणी पावसाळी गटार असले तरी चेंबरवर मेनकापड, माती, लाकूड, खडे बसल्या पाण्याचा निचरा होत नाही. मलनि:सारण विभागासह क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी रोज रस्त्याने पाहणी करतात, पण त्यांनी ठेकेदाराला चेंबर साफ करण्याच्या सूचना न दिल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत.

मंगळवारी (ता. १६) झालेल्या पावसामुळे टिळक चौक, शिवाजी रस्ता, बुधवार चौक, केळकर रस्ता, शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, स्वारगेट, नेहरू रस्ता, जंगली महाराज रस्ते व आपटे रस्ता येथील आतल्या गल्ल्या, बीएमसीसी महाविद्यालय रस्ता, सेव्हन लव्हज चौक, फातिमानगर चौक, भैरोबा नाला रेस कोर्स, रवी दर्शन चौक, वैभव टॉकीज परिसर, बाणेर रस्ता, सिंध सोसायटी परिसर, सेनापती बापट रस्ता, कोरेगाव पार्क मधील अनेक गल्ल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, आळंदी रस्ता, पुणे नगर रस्त्यावर अनेक ठिकाणी साचले होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याची तक्रार आल्यानंतर तेथे पथक पाठवून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली.

महत्त्वाचे

- महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले आणि पावसाळी गटारे सफाई करण्याच्या अनेक निविदा एप्रिल महिन्यात काढल्या

- यामध्ये २३ निविदा या नाले सफाईच्या असून त्यासाठी १४ कोटी तर पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी १५ निविदा काढण्यात आल्या

- त्यासाठी १२.५० कोटी रुपये खर्च केला जात आहे असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले

- त्यानंतर आणखी साडेचार कोटी रुपयांच्या निविदा स्थायी समितीने मान्य केल्या आहेत

- शहरात सुमारे २ लाख ६८ हजार मिटर लांबीचे पावसाळी गटार, तर ५६ हजार ७०० चेंबरची संख्या आहे

- महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय ठेकेदार नियुक्त केले आहेत

- त्यांनी पावसाळ्याच्यापूर्वी तसेच पावसाळ्यात गटारांची स्वच्छता करणे, चेंबरच्या झाकणांवर अडकलेली माती, खडे अन्य कचरा काढणे आवश्‍यक

- पण एकदा काम केले की पुन्हा त्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते

पावसाळी गटार सद्यःस्थिती

  • पावसाळी गटारांची एकूण लांबी - २,६८, ०६२

  • चेंबर्सची एकूण संख्या - ५६,५९८

  • पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी खर्च - सुमारे १७ कोटी

पावसाळी गटारांची स्वच्छता नियमीत केली जात आहे. पाणी तुंबल्यानंतर मलनि:सारण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयाची पथके घटनास्थळी जाऊन त्वरित पाण्याचा निचरा करत आहेत. शहरात पाणी तुंबण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी ठेकेदारांकडून पावसाळी गटारांची स्वच्छता करून घेण्याचे आदेश दिले जातील.

- जगदीश खानोरे, मुख्य अभियंता, मलनिसारण विभाग