पुणे (Pune) : विकास कामांचा निधी अन्यत्र वळविणे, विद्यापीठाला मिळणाऱ्या देणग्यांच्या रकमा सर्वसाधारण निधीत दाखविणे, ताळेबंदातील खर्चाबाबतचा सविस्तर तपशील सादर न करणे, विद्यार्थी कल्याण निधीच्या विनियोगाबाबत अस्पष्टता, अशा त्रुटींमध्ये दुरुस्ती करण्याच्या मागण्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी केल्या.
यासह आवश्यक दुरुस्त्या करण्याबाबत सूचना करीत सदस्यांनी विद्यापीठाच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे लेखे, संविधानिक लेखा परिक्षकांचा लेखा परीक्षण आणि अनुपालन अहवालास रविवारी अखेर मंजुरी दिली.
विद्यापीठाच्या पूर्वनियोजनाप्रमाणे अधिसभा शनिवारी एकच दिवस होती. लेखापरीक्षण अहवालावरून काल सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले आणि हा अहवाल अमान्य केला. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून सदस्यांनी रविवारी अधिसभा सुरू ठेवण्याची आग्रही मागणी केली. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी ही मागणी मान्य केली. त्यानुसार आज अहवालावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
अहवालातील काही चुका मान्य करीत वित्त विभागाने दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सदस्यांनी अहवालास मान्यता दिल्याने विद्यापीठ प्रशासनाने अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.
विद्यार्थी कल्याण निधीसह अन्य कल्याण निधीचा सविस्तर आढावा विद्यापीठाने सादर करावा, अशी मागणी अधिसभा सदस्य विनायक आंबेकर यांनी केली. त्यावर हा तपशील पुढील महिन्याभरात जाहीर करण्याचे आश्वासन डॉ. गोसावी यांनी दिले.
या वेळी आंबेकर यांनी विद्यापीठाने सादर केलेल्या ताळेबंदातील तांत्रिक चुका काढत, त्यात दुरुस्ती करण्यास आणि ताळेबंद वाणिज्य विभागाकडून तयार करून घेण्याची सूचना केली आणि तसे विद्यापीठ प्रशासनाने मान्य केले.
दरम्यान, विकास कामांचा निधी केवळ दिला जातो, परंतु तो वापरला जाईल आणि तो विकास खऱ्या अर्थाने डोळ्यांना दिसायला हवा, असेही सदस्यांनी सुचविले. प्रभारी पदांचा कालावधी ठरविण्यात यावा आणि एकाचीच जास्त काळासाठी नियुक्ती न करता बदल करण्यात यावेत, अशी विनंती सदस्यांनी केली. ती विद्यापीठाने मान्य केली.
अधिसभेत अनुमोदन मिळालेले काही प्रस्ताव
- प्रत्येक विद्याशाखेत व्यवसायाभिमुख कमी कालावधीचे अभ्यासक्रम सुरू करणे
- विद्यापीठाच्या वर्धापनदिनानिमित्त ‘सर्वोत्कृष्ट महाविद्यालय (सांस्कृतिक) पुरस्कार’ सुरू करणे
- बॅरिस्टर मु. रा. जयकर यांच्या साहित्याचे स्वतंत्र दालन त्यांच्या नावाने असलेल्या ग्रंथालयात सुरू करणे