Driving Licence
Driving Licence Tendernama
पुणे

RTO : झोपी गेलेला जागा झाला अन् पुणेकरांचा हातात वाहन परवाना आला! काय आहे प्रकरण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्यासह देशभरातील वाहन परवान्याची मागील काही दिवस बंद पडलेली यंत्रणा सोमवारी सकाळी सुरू झाली. गेल्या १२ दिवसांपासून ‘सारथी’च्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने एकही वाहन परवाना दिला गेला नाही. यंत्रणेतील दोष दूर झाल्याने सोमवारपासून वाहन परवान्यांचे काम अखेर सुरू झाले.

केंद्र सरकारच्या ‘सारथी’ संकेतस्थळाच्या सर्व्हरमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्यामुळे देशातील वाहन परवाने देण्याची प्रक्रिया गेल्या १२ दिवसांपासून ठप्प झाली होती. ‘सारथी’वर आत्तापर्यंत काढण्यात आलेल्या सुमारे २५ कोटी वाहनधारकांच्या वाहन परवान्याची माहिती (डेटा) गहाळ झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) युद्धपातळीवर काम करून तो ‘डेटा’ मिळविला आहे. त्यामुळे सोमवारपासून ‘सारथी’ची यंत्रणा पूर्ववत करण्यात आली आहे. सोमवारी दिवसभरात पुणे आरटीओ कार्यालयात सुमारे ५०० वाहन परवानाचे काम झाले आहे.

मंगळवारपासून वाहन परवानासाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वाहन परवाना देण्यास सुरवात झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुदतीत वाढ
अनेक वाहनधारकांच्या शिकाऊ परवान्याची मुदत एक फेब्रुवारी रोजी संपली. त्या दिवसापासून यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे वाहनधारकांना विहित मुदतीत कायमस्वरूपाचा परवाना काढता आला नाही. त्यामुळे परिवहन विभागाने वाहन परवानाची मुदत वाढवून दिली असून २९ फेब्रुवारीपर्यंत त्यांना कायमस्वरूपाचा परवाना काढता येणार आहे. परिवहन विभागाने हा निर्णय घेतल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तांत्रिक दोष दूर झाल्याने सोमवारपासून वाहन परवाना देण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच ज्या परवानाची मुदत या कालावधीत संपली, त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
- विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, मुंबई