Old Mumbai Pune Highway
Old Mumbai Pune Highway Tendernama
पुणे

Pune-Mumbai जुन्या महामार्गावरील रुंदीकरणाचे काम वेगात; खडकीतील वाहतूक होणार सुरळीत

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अंडी उबवणी केंद्र ते बोपोडी दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. हे काम आतापर्यंत चाळीस टक्के पूर्ण झाले आहे. येत्या दीड महिन्यात या रस्त्यावरून बोपोडी ते ऑल सेंटस्‌ स्कूलपर्यंत अवजड वाहतूक सुरू होण्याची शक्‍यता आहे. यामुळे खडकीतील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

बोपोडी चौक ते अंडी उबवणी केंद्र या तीन किलोमीटर अंतरामधील मेट्रो प्रकल्प, रस्ता रुंदीकरण व कॉंक्रीटीकरणाची कामे काही प्रमाणात पूर्ण झाल्याने खडकी बाजारातून जाणाऱ्या हलक्‍या वाहनांसाठी एक सप्टेंबरपासून बोपोडी चौक ते ऑल सेंटस्‌ स्कूलपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. महापालिकेच्या पथ विभागाकडून रस्ता रुंदीकरणाचे हे काम सुरू आहे. नुकतीच बोपोडीजवळील अतिक्रमणे हटविली आहेत. जयहिंद चित्रपटगृह व जीवन प्राधिकरणाची काही जागा महापालिकेच्या ताब्यात येणे बाकी असून, ती ताब्यात आल्यास रस्ता रुंदीकरणास आणखी गती मिळेल.

अंडी उबवणी केंद्र ते बोपोडी चौक या दरम्यानच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. आगामी दीड महिन्यात बोपोडी ते ऑल सेंटस्‌ स्कूल दरम्यान अवजड वाहतूक सुरू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल. परिणामी, खडकीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील अवजड वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूक समस्या सुटण्याची शक्‍यता आहे, असे पथ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे यांनी सांगितले.

जुन्या मुंबई -पुणे रस्त्याचे काम वेगात सुरू आहे. आतापर्यंत ४० ते ५० टक्के काम झाले आहे. दरम्यान, बोपोडी ते ऑल सेंटस्‌ स्कूल या दरम्यानच्या रस्त्यावर हलक्‍या वाहनांची वाहतूक सुरू केली आहे. येत्या एक-दीड महिन्यांत अवजड वाहनांची वाहतूक सुरू होऊ शकते.

- साहेबराव दांडगे, अधीक्षक अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका

...तर तोडगा निघण्याची शक्‍यता

खडकी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीमध्ये नॅशनल हॉटेल व अन्य काही मालमत्ता आहेत. संबंधित मालमत्ता भाडेतत्वावर आहेत. संबंधित भाडेकरूंनी न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणास अडथळा येत आहे. लष्कराच्या मालमत्ता विभागाने यासंदर्भात लक्ष घालण्याचे आश्‍वासन महापालिकेला दिले आहे. त्यामुळे त्यावरदेखील लवकरच तोडगा निघण्याची शक्‍यता आहे.