पुणे (Pune): रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्व विभागाने गुड न्यूज दिली आहे. रेल्वेच्या आरक्षण केंद्रावरून तिकीट काढणाऱ्यांना रेल्वेच्या नव्या निर्णयाचा फायदा होणार आहे. (Good News From Railway)
रेल्वे आरक्षण केंद्रावरून तिकीट काढण्याच्या वेग आता वाढणार आहे. रेल्वेच्या ‘क्रिस’ या संस्थेने आरक्षण प्रणालीत आवश्यक तो बदल करण्यास सुरवात केली आहे. मिनिटाला तब्बल दीड लाख तिकीटे निघू शकतील, अशी अद्ययावत यंत्रणा तयार केली जात आहे.
सध्या आरक्षण केंद्रावरून मिनिटाला ३२ हजार तिकीट दिले जात आहेत. यामुळे प्रवाशांना आरक्षण केंद्र आणि यात्री तिकीट सुविधा केंद्रावर तिकीट कमी वेळेत उपलब्ध होणार आहे. पुढच्या महिन्यात ‘क्रिस’ हा बदल करणार आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. मागील आर्थिक वर्षात देशात सुमारे ८५० कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. येत्या काही वर्षात या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने तिकिटाची प्रणाली अद्ययावत करून त्याचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे लाखो प्रवाशांची सोय होईल. हा बदल केवळ रेल्वे स्थानकावरील आरक्षण केंद्र आणि यात्री तिकीट सुविधा केंद्रावरील आरक्षण प्रणाली पुरता लागू असणार आहे. ऑनलाइन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी याचा लाभ घेता येणार नाही.
‘क्रिस’ संस्था करणार बदल
भारतीय रेल्वेची संगणकीकृत प्रणाली ही ‘क्रिस’ (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम - रेल्वे माहिती प्रणाली केंद्र) या संस्थेकडून विकसित केली जाते. हीच संस्था आता आरक्षण प्रणाली अद्ययावत करीत आहे. त्यामुळे मिनिटाला दीड लाख तिकिटे काढणे शक्य होणार आहे. गेल्या काही दिवसांत रेल्वे प्रशासनाने दलालांना चाप लावण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. शिवाय आरक्षण प्रणालीतील अडचणीही दूर झाल्या आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून तिकीट लवकर मिळण्याची प्रक्रिया अधिक जलद होत आहे.
रेल्वे बोर्डाने घेतलेल्या या निर्णयाची संपूर्ण देशात अंमलबजावणी होणार आहे. मात्र, यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रणाली अद्ययावत होत असल्याने याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे. प्रवाशांना कमी वेळेत आरक्षित तिकीट उपलब्ध होणार आहे.
- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई