Railway Tendernama
पुणे

Railway: मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी सरकारने दिली गुड न्यूज

पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेस मिळणार गती

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्यमंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ५ हजार १०० कोटी रुपये असून त्यामध्ये जमीन अधिग्रहण खर्चाचाही समावेश आहे. यातील ५०:५० टक्के आर्थिक सहभागाची जबाबदारी केंद्रसरकार व राज्यशासन उचलणार आहेत. राज्य शासनाचा एकूण वाटा २ हजार ५५० कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या हिस्स्यातील या २ हजार ५५० कोटींपैकी पुणे महानगरपालिका (२० टक्के) ५१० कोटी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (२० टक्के ) ५१० कोटी, पीएमआरडीए (३० टक्के) ७६५ कोटी असा स्थानिक संस्थांचा सहभाग राहणार असून उर्वरित रक्कम राज्य शासन देणार आहे.

या निर्णयामुळे पुणे-लोणावळा रेल्वे प्रवाशांचा वाढता ताण कमी होऊन उपनगरीय रेल्वे सेवांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच, पुणे-मुंबई या दोन महानगरांतील दळणवळण अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मोठा हातभार लागणार आहे.