पुणे (Pune) : जिल्हा परिषदेतील लाचखोरी प्रकरणानंतर दुसऱ्या टप्प्यात मोठी कारवाई करत २५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर बांधकाम विभागात मोठा फेरबदल करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते, सुरूवातीला सहायक लेखाधिकाऱ्याची बदली केल्यानंतर अनेक वर्षांपासून एकाच विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे.
कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि एका कनिष्ठ अभियंत्याला लाचखोरी करताना रंगेहात पकडल्यानंतर प्रशासनाने बांधकाम विभागाच्या उत्तर व दक्षिण विभागातील माहिती गोळा करण्यास सुरूवात केली होती.
टेंडर प्रक्रियेतील विविध कामांची जबाबदारी सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलली आहेत. मात्र, या बदल्या केवळ प्रशासकीय कारणास्तव केल्याचे प्रशासनाने आदेशात नमूद केले आहे.
लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर एका सहायक लेखाधिकाऱ्याची तातडीने बदली केली होती. त्याचवेळी उत्तर व दक्षिण विभागातील इतर कर्मचाऱ्यांविरोधातही गंभीर तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन प्रशासनाने या बदल्या केल्या आहेत.