chandani chowk
chandani chowk Tendernama
पुणे

Pune: चांदणी चौकातील काम अन् आणखी 2 महिने थांब! काय आहे प्रकरण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौकात (Chandani Chowk) एनडीए व बावधनला जोडण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी आवश्यक असलेले गर्डर तयार झाले आहेत. येत्या काही दिवसांत ते बसविण्याचे कामदेखील सुरू होईल. ९ गर्डरच्या माध्यमातून १५० मीटर लांबीचा व ३२ मीटर रुंदीचा पूल तयार होणार आहे. या पुलाला जोडणाऱ्या रॅम्प ३ व रॅम्प ७ चे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पूल बांधून तयार झाल्यावर केले जाईल. मात्र त्याला आणखी किमान दोन महिने लागणार असल्याने मे मधील पुलाच्या उद्‍घाटनाचा मुहूर्त टळणार आहे.

चांदणी चौकात सुमारे ३९७ कोटी रुपयांचा खर्च करून १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दोन ठिकाणी अंडरपास व ८ नवीन रॅम्पदेखील तयार करण्यात आले आहेत. कोंडीला अडथळा ठरणारा पूर्वीचा पूल पाडण्यात आला. नव्या पुलाचे काम वेगाने सुरू आहे. नवा पूल पूर्वीच्या तुलनेत मोठा आहे. त्यामुळे वाहनांची संख्या वाढली तरीही कोंडी होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.

असा आहे नवीन पूल
बावधन-एनडीएला जोडणारा हा पूल १५० मीटर लांबीचा व ३२ मीटर रुंदीचा आहे. पूर्वीचा पूल हा ५० मीटर लांबीचा व २० मीटर रुंदीचा होता. पूर्वीच्या तुलनेत पुलाच्या लांबी व रुंदीत वाढ झाली आहे. तसेच जुन्या पुलाचा खांब रस्त्याच्या मधोमध येत असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत होता. वाहनांसाठी जागा कमी पडायची. नव्या पुलामध्ये तसे नाही.

अल्ट्रा हायस्ट्रेंथ काँक्रिटचा वापर
पूल बांधताना पहिल्यादांच या पद्धतीचा वापर केला आहे. यात लोखंडाचा वापर केला जात नाही. स्टीलचा चुरा, विशिष्ट प्रकारचा दबाव निर्माण करून तयार करण्यात आलेले काँक्रिट व काही प्रमाणात फायबरचादेखील वापर केला आहे. त्यामुळे पुलाला अधिक मजबुती प्राप्त होते. पुलाच्या सुरवातीला व शेवटी खांबांचा वापर केला आहे. पुलाच्यामध्ये खांब नाही.

बावधन-वारजे जोडणारा रॅम्प सुरू
मुळशी व बावधनहून वारजे, साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यासाठी रॅम्प क्रमांक ६ तयार करण्यात आला. याचे काम पूर्ण झाल्याने या रॅम्पवरून वाहतूक सुरू झाली आहे. बहुतांश रॅम्पचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

नवीन पुलाचे काम वेगाने सुरू आहे. एनडीए चौकाच्या बाजूच्या भागात खांब उभा करण्याचे काम सुरू आहे. दोन महिन्यांत पूल बांधून तयार होईल.
- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण