Pune
Pune Tendernama
पुणे

Pune : पुणे शहरात यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होणार का? वाचा सविस्तर...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरातील नाले आणि पावसाळी गटारे स्वच्छ करण्यासाठी महापालिका (PMC) प्रशासनाने ११ कोटी रुपयांचे २३ टेंडर मान्य केले.

महापालिकेने निश्‍चित केलेल्‍या पूर्वगणनपत्रकापेक्षा ५३ टक्क्यापर्यंत कमी रकमेचे टेंडर आले आहेत. त्यामुळे ठेकेदारांनी काम मिळविण्यासाठी कमी रकमेची टेंडर भरली असली तरी नालेसफाई आणि पावसाळी गटारांची स्वच्छता व्यवस्थित होणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महापालिकेतर्फे दरवर्षी शहरातील नाले व पावसाळी गटारांची स्वच्छता केली जाते. या कामांची मुदत सहा महिने ते एक वर्ष असताना एप्रिल व मे हे दोन महिने काम होते. पण त्यानंतर दुर्लक्ष होत असल्याने सप्टेबर व ऑक्टोबर महिन्यात पूरस्थिती अनुभवावी लागत आहे. त्यामुळे यंदा सर्व कामांची काटेकोर तपासणी केली जाईल, असे तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले होते.

सांडपाणी व्यवस्थापन विभागाने १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नाले व पावसाळी गटारे साफ करण्यासाठी टेंडर मागविल्या होत्या. त्यासाठीचे प्रस्ताव शुक्रवारी (ता. १५) गडबडीत स्थायी समितीला सादर करण्यात आले. आयुक्तांनी त्यास मंजूर दिली असून, आचारसंहितेच्या धास्तीने त्याच दिवशी या सर्व कामांची वर्क ऑर्डर काढण्याची अधिकाऱ्यांची गडबड सुरू होती.

मात्र, या टेंडर महापालिकेच्या निश्‍चित खर्चापेक्षा ३० टक्के, ४० टक्के, ५३.५० टक्के इतक्या कमी दराने भरल्या आहेत. त्यामुळे ठेकेदारांकडून नाल्यांची व पावसाळी गटारांची, चेंबरची स्वच्छता होणार का, याकडे लक्ष लागले आहे.